CoronaVirus News: "...अन्यथा देशात कोरोनामुळे आतापर्यंत ६८ हजार जणांचा मृत्यू झाला असता"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 06:47 PM2020-05-22T18:47:23+5:302020-05-22T18:48:11+5:30
आतापर्यंत देशात कोरोनाचे १ लाख २० हजाराच्या आसपास रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा साडे तीन हजारांहून अधिक आहे.
नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या एक लाख वीस हजारांच्या आसपास पोहोचली असून मृतांचा आकडा साडे तीन हजारांच्या मागे गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात जवळपास दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्याचं कोरोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील एका गटानं म्हटलं आहे. लॉकडाऊन योग्य वेळी जाहीर केला नसता, तर सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा नेमका किती असता, याची माहिती या गटानं दिली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील गटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनमुळे संक्रमणाचा वेग घटल्याचं मत व्यक्त केलं. 'लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसारचा वेग घटला. लॉकडाऊन नसता, तर कोरोना रुग्णांचा संख्या खूप जास्त असती. लॉकडाऊनमुळे रुग्णांसोबतच मृतांचा आकडादेखील घटला. अन्यथा आजच्या घडीला देशात ३७ ते ६८ हजार जणांचा मृत्यू झाला असता. तर बाधितांची संख्या १४ ते २९ लाख असती,' असं पॉल म्हणाले.
देशातले ८० टक्के कोरोना रुग्ण केवळ पाच राज्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेशचा समावेश होतो. देशातले ९० टक्क्यांहून अधिक कोरोना बाधित १० राज्यांमध्ये असून उर्वरित राज्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं पॉल यांनी सांगितलं. मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, ठाणे पुणे, इंदूर, कोलकाता, हैदराबाद आणि औरंगाबाद या १० शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण असल्याची माहिती पॉल यांनी दिली.
पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका
"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"
भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....