CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत २७ जवानांचा मृत्यू, ८७२ रेल्वे कर्मचारी संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 08:57 AM2020-07-08T08:57:35+5:302020-07-08T08:57:53+5:30
रविवारपर्यंत सीआरपीएफकडे 1510 पॉझिटिव्ह प्रकरणे होती, त्यापैकी 755 ऍक्टिव्ह आहेत.
निमलष्करी दलांच्या जवानांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोनानं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आतापर्यंत 27 जवानांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 18 जवानांचा मृत्यू केवळ जून महिन्यात झाला. त्याच वेळी संक्रमित जवानांची संख्या 4800च्या पलीकडे गेली आहे. त्यातील केवळ 1905 प्रकरणे सध्या ऍक्टिव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सीआरपीएफच्या नऊ जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यातील सात जवानांचा जूनमध्ये मृत्यू झाला. रविवारपर्यंत सीआरपीएफकडे 1510 पॉझिटिव्ह प्रकरणे होती, त्यापैकी 755 ऍक्टिव्ह आहेत. त्याच वेळी सीआयएसएफमध्ये आठ जवानांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी गेल्या महिन्यात चार जवानांचा मृत्यू झाला. सीआरपीएफमध्ये कोरोनाची 1021 प्रकरणे आढळली आहेत.
त्यापैकी 38 टक्के ऍक्टिव्ह आहेत. तसेच बीएसएफमध्येही 1300हून अधिक प्रकरणे सापडली असून, पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात तिघांचा मृत्यू झाला. आयटीबीपीमध्ये 425 प्रकरणे आढळून आली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. एसएसबीमध्ये १५३ जवानांना संसर्ग झाला असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.
रेल्वेचे 872 कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय संक्रमित
मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये 872 कर्मचारी, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 86 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिका -यांच्या म्हणण्यानुसार, सर्वांना पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण प्रकरणांपैकी 559 मध्य रेल्वेची आणि 313 पश्चिम रेल्वेची आहेत. सध्या रुग्णालयात २२ कर्मचारी आहेत, तर उर्वरित कुटुंब आणि सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. रेल्वे संघटनांनी असा दावा केला आहे की, 15 जूननंतर लोकल गाड्या सुरू झाल्यापासून संक्रमित कामगारांची संख्या वाढली आहे.
केंद्रीय मंत्री प्रताप सारंगींना ठेवले अलग
ओडिशाचे बालासोरचे आमदार सुकांतकुमार नायक यांना कोरोनाला संसर्ग झाल्याची खात्री पटल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांना नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी अलग ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या दोन कार्यक्रमात आमदाराने सारंगीसोबत स्टेज सामायिक केला होता. सारंगी म्हणाले, 2 आणि 3 जुलै रोजी त्यांनी सुकांतसोबत दोन कार्यक्रमात हजेरी लावली होती. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमदार सुकांतकुमार यांचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर सारंगी यांना अलग करण्यात आले आहे.
ओडिशामध्ये रुग्णांची संख्या 10,000च्या पार
ओडिशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 571 नवीन प्रकरणे आढळून आल्यानंतर रुग्णांची संख्या 10,000च्या पार गेली आहेत. त्याचबरोबर साथीच्या आजाराने आणखी चार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 42वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी सांगितले की, राज्यात संक्रमितांची एकूण संख्या 10,097 आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि गंजममध्ये तीन आणि कटकमधील एकाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा
STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार
मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे