coronavirus: कोरोना चाचण्यांत भारत जगात १५ व्या स्थानी, दररोज १५ लाख चाचण्या करण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:29 AM2020-09-05T06:29:43+5:302020-09-05T06:31:02+5:30
एकूण कोरोना चाचण्यांमध्ये भारत ४.६६ कोटी चाचण्यांद्वारे तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने ९.०४ कोटी, तर अमेरिकेने ८.१८ कोटी चाचण्या घेतलेल्या आहेत. याबाबतीत भारत हा रशिया, आॅस्ट्रेलिया, ब्राझील, इटली, स्पेन व इतर विकसित देशांच्या पुढे आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भारताने शुक्रवारी कोरोनाच्या ११.७० लाख चाचण्या घेऊन नवीन रेकॉर्ड स्थापन केला आहे; परंतु प्रत्येक १० लाख लोकांमागे केलेल्या चाचण्यांमध्ये भारत १५ व्या स्थानी आहे. भारतात प्रत्येक १० लाख लोकांमागे ३२,१२३ जणांची चाचणी करण्यात येत आहे. रशियात हीच चाचणी २.५१ लाख, अमेरिकेत २.४७ लाख, आॅस्ट्रोलियात २.४३ लाख व चीनमध्ये ६२,८१४ जणांची करण्यात येत आहे.
एकूण कोरोना चाचण्यांमध्ये भारत ४.६६ कोटी चाचण्यांद्वारे तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने ९.०४ कोटी, तर अमेरिकेने ८.१८ कोटी चाचण्या घेतलेल्या आहेत. याबाबतीत भारत हा रशिया, आॅस्ट्रेलिया, ब्राझील, इटली, स्पेन व इतर विकसित देशांच्या पुढे आहे
.
देशात गोवा १.३१ लाख चाचण्यांद्वारे प्रत्येक १० लाख लोकांमागील चाचण्यांत आघाडीवर आहे, तर दुसरे भाजपशासित राज्य मध्यप्रदेश १ सप्टेंबरपर्यंत १६,७८६ चाचण्या घेऊन या यादीत तळाशी राहिलेले आहे. महाराष्टÑाने प्रत्येक दहा लाख व्यक्तींमागे ३४,१८९ जणांची चाचणी घेऊन मोठा पल्ला गाठला आहे. राज्याने १ जून रोजी दहा लाख लोकांमागे केवळ ३,५०० चाचण्या घेतल्या होत्या. तीन महिन्यांत ही संख्या दसपट झाली आहे.
‘लोकमत’ला सांगितले की, भारतात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. आॅगस्टमध्ये ९.५ टक्के असणारे प्रमाण ३ सप्टेंबर रोजी ८.५ टक्क्यांपर्यंत खाली उतरले आहे, ही दिलासादायक बाब आहे. भारताने आता दररोज १५ लाख चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. लवकरच मागेल त्याची चाचणी करण्यात येणार आहे. यापुढे पॉझिटिव्हिटी दर ७.५ टक्क्यांपर्यंत घसरेल, अशीही अपेक्षा आहे.
मोदी सरकारने मार्चमध्ये 1,००० चाचण्यांची असलेली संख्या आता १२ लाखांवर नेली आहे.
दिल्ली विमानतळावर चाचणीची सोय
दिल्ली विमानतळाने टर्मिनल तीनच्या अनेकस्तरीय कार पार्किंग भागात येणाºया आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना विषाणूची चाचणी करण्याची सोय या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून उपलब्ध होणार आहे. या प्रवाशांना लगेचच उपलब्ध असलेल्या देशांतर्गत विमानाने जायचे असेल, असे दिल्ली एअरपोर्ट इंटरनॅशनल लिमिटेडने (डीएआयएल) शुक्रवारी म्हटले. चाचणी झाल्यानंतर चार ते सहा तासांत तिचा निकाल मिळेल.
देशात ३९ लाखांवर कोरोना रुग्ण
नवी दिल्ली : देशामध्ये शुक्रवारी कोरोनाचे ८३,३४१ नवे रुग्ण आढळून आल्याने बाधितांची एकूण संख्या ३९ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे.
या संसर्गामुळे शुक्रवार सकाळपर्यंत १,०९६ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ६८,७४२ झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३९,३६,७४७ झाली असून, बरे झालेल्यांचे प्रमाण ७७.१५ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७४ टक्के इतका कमी आहे. कोरोना चाचण्यांची वाढलेली संख्या व रुग्णांवर तातडीने होणारे उपचार यामुळे हे यश मिळाले आहे. सध्या ८,३१,१२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हरयाणात २ धाब्यांवर आढळले ७५ रुग्ण
चंदीगड : हरयाणात गुरुवारी कोरोनाचे नवे १८८१ रुग्ण आढळले असून एका दिवसात आढळलेल्या रुग्णांत ही संख्या सर्वात जास्त आहे. यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या ७०,०९९ झाली असून १९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ७४० झाली. लावले आहे.
1881 रुग्णांमध्ये सुखदेव धाब्याचे ६५ कामगार असून शेजारी असलेल्या मुरथालमधील (सोनेपत) गरम धरम धाब्याचे १० कामगार आहेत. त्यामुळे सोनेपत जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत या दोन्ही धाब्यांना कुलूप लावले.
चाचण्या ४ कोटी ६६ लाख
देशात ३ सप्टेंबर रोजी ११,६९,७६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंतच्या चाचण्यांची संख्या ४,६६,७९,१४५ झाली आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या व बळी यांचे प्रमाण जगभरात अमेरिकेत सर्वाधिक आहे.
दुसºया क्रमांकावर ब्राझील, तर तिसºया स्थानी भारत आहे.
भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने ७ आॅगस्ट रोजी २० लाखांचा टप्पा ओलांडला.
त्यानंतर २३ आॅगस्ट रोजी रुग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली.
बडोद्यात अपोलो टायर्सचे 476 कामगार कोरोना बाधित
बडोदा : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच येथील अपोलो टायर्सच्या ४७६ कामगारांतही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याचे वृत्त आहे. या कंपनीतील पाच कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कामगार संघटनेने म्हटले आहे.
तब्बल ४७६ कामगारांत कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे सर्वच कामगारांची चाचणी करावी, अशी मागणी कामगार संघटनेने व्यवस्थापनाकडे केली आहे. फॅक्टरीमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन होत नसल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.