CoronaVirus News: ...तर आज भारत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाणार; 'या' देशाला मागे टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 11:55 AM2020-07-05T11:55:06+5:302020-07-05T11:57:36+5:30
गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; एकूण रुग्णसंख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर
मुंबई: लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशातील कोरोनाबाधितांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार ८५० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे. ही आकडेवारी पाहता आज भारत रशियाला मागे टाकण्याची दाट शक्यता आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहोचली आहे. तर रशियातील रुग्णसंख्या ६ लाख ७४ हजार ५१५ इतकी आहे. भारतातील कोरोना रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता भारत आजच रशियाला मागे टाकू शकतो.
भारतात गेल्या २४ तासांत ६१३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दगावलेले नाहीत. देशात सध्याच्या घडीला २ लाख ४४ हजार ८१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १९ हजार २६८ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढत असल्याचं अधोरेखित झालं आहे.
भारत आणि रशियाची तुलना केल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत जेमतेम दीड हजाराचं अंतर आहे. भारतातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग पाहता आज संध्याकाळपर्यंत भारत रशियाला मागे टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर जाईल. या यादीत अमेरिका (२९ लाखांहून अधिक रुग्ण) पहिल्या, तर ब्राझील (१५.५ लाख रुग्ण) दुसऱ्या स्थानी आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात ६१३ कोरोना रग्ण मरण पावले. याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही कोरोना रुग्ण दगावले नव्हते. १६ जूनला देशभरात २ हजार मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र त्यावेळी दिल्ली आणि महाराष्ट्रातील आकडेवारीत गोंधळ झाला होता. त्यामुळे अचानक कोरोनामुळे झालेले मृत्यू वाढले. काल याच दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूंची नोंद झाली.