Coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 09:02 AM2020-03-30T09:02:06+5:302020-03-30T09:04:34+5:30
तर महाराष्ट्रात कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या पहिल्यांदाच दोन अंकावर पोहचली आहे.
नवी दिल्ली – भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. रविवारी देशात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १ हजाराच्या वर गेला आहे. तर एकाच दिवसात १३० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राजधानी दिल्लीत रुग्णांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका दिवसात दिल्लीत २३ कोरोनाचे रुग्ण आढळले.
तर महाराष्ट्रात कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या पहिल्यांदाच दोन अंकावर पोहचली आहे. देशपातळीवर सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसाला १०० च्या वर पोहचत आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा प्रार्दुभाव जलदगतीने व्हायला सुरुवात झाल्याचं दिसून येतं. आतापर्यंत देशात १ हजार १२२ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयाने अद्याप १ हजार २४ रुग्ण आणि २७ मृत्यू अशी आकडेवाडी सांगितली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक २०३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी कोरोनामुळे २ जणांचा मृत्यूही झाला. राज्यातील मृतांची आकडेवारी ८ झाली आहे. मृतांमध्ये मुंबई उपनगरातील टॅक्सी ड्रायव्हरची पत्नी आणि बुलढाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. या दोघांचे वय ४० च्या आसपास होतं. तसेच दोघांनीही कोणताही परदेश दौरा केला नव्हता त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा धोका निर्माण झाला आहे.
कमी दिवसात राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्या २०० च्या वर पोहचली आहे. जेव्हा राज्यात कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं त्यावेळी १०० चा आकडा गाठण्यासाठी १६ दिवस लागले पण १०० वरुन २०० रुग्ण होण्यासाठी ५ दिवसाचा अवधी लागला. राष्ट्रीय आरोग्य मिशनचे आयुक्त डॉ. अनुप कुमार यांनी सांगितले की, राज्यातील ३५ लोक कोरोनापासून बरे झालेत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात २०३ रुग्ण आणि २ जणांचा मृत्यू, गुजरातमध्ये ५८ रुग्ण आणि ५ मृत्यू झाले आहेत. रविवारी गुजरातमध्ये ४७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे. रविवारी दिवसभरात १९ नवे रुग्ण आढळले तर हा आकडा ८० पर्यंत पोहचला आहे. कोरोनाग्रस्तांचे नवीन केसेस नोएडा आणि मेरठमधून समोर आलेत. मेरठ १२, नोएडा ४, गाझियाबाद २ आणि बरेली १ असे नवे रुग्ण आढळले आहेत.