CoronaVirus News: देशात रुग्णांची संख्या ३ लाखांवर; मृतांचा आकडा ९ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:34 AM2020-06-14T03:34:09+5:302020-06-14T06:46:01+5:30
एका दिवसात ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण
नवी दिल्ली : कोरोनाचे शुक्रवारी ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. इतके रुग्ण एकाच दिवसात याआधी कधीही सापडले नव्हते. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
या आजारामुळे शुक्रवारी ३८९ जणांचा बळी गेला. त्यामुळे बळींची संख्या सुमारे ९ हजार झाली आहे. दिल्लीमध्ये या दिवशी १२९ जण मरण पावले.
देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून त्यांची संख्या एका लाखाहून जास्त आहे. सध्या १,४५,७७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर अन्य दीड लाख रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे हे सुचिन्ह असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडूप्रमाणेच गुजरातमध्येही कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. या राज्यात शुक्रवारी कोरोनाचे ४९५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे गुजरातमधील कोरोना रुग्णांची एकुण संख्या २२ हजारपेक्षा अधिक झाली असून तिथे १४१५ जणांचा बळी गेला आहे.
युरोप अजिबात सुरक्षित नाही
कोरोना विषाणूमुळे पसरलेली साथ अत्यंत भयानक असून त्यामुळे सर्व देशांनी अतिशय दक्ष राहिले पाहिजे. जिथे ही साथ ओसरली आहे असे चित्र सध्या दिसत आहे, तिथेतर आणखी सतर्क राहायला हवे असे जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसिस यांनी म्हटले आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर घेब्रेसिस यांचे उद्गार महत्त्वाचे ठरतात. ते म्हणाले की, युरोपमध्ये कोरोना साथीची तीव्रता खूप कमी झाली असली तरी जगाच्या इतर भागांत ती वाढत आहे.
युरोपही या साथीपासून सुरक्षित नाही कारण तिथेही पुन्हा. काही रुग्ण आढळून आले होते.