CoronaVirus : गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू तर १२११ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:19 PM2020-04-14T17:19:21+5:302020-04-14T17:25:34+5:30
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२११ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२११ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०३६३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ३१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ३३९ इतकी झाली आहे. तर १०३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याचबरोबर, आतापर्यंत २१८ लाईफलाईन फ्लाइटच्या माध्यमातून जवळपास ३७७,५ टन आवश्यक वैद्यकीय उपकरणे देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये पोहोचविण्यात आली आहे. इंडियन पोस्टल नेटवर्कने इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन, हेल्थ सर्व्हिसचे डीजी आणि ऑनलाइन फार्मा कंपन्यांसोबत टायअप करुन रुग्णालये आणि रुग्णांपर्यंत औषधे पोहोचविली, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.
Till now 1036 people have been cured. Yesterday 179 people were diagnosed and found cured: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry #Coronaviruspic.twitter.com/fpxCUEozv6
— ANI (@ANI) April 14, 2020
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविणार असल्याचे सांगितले. याशिवाय, २० एप्रिलपासून ज्याठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही, ते ठिकाण एका नियमावलीनुसार लॉकडाऊनमधून वगळण्याची शक्यता सुद्धा नरेंद्र मोदी यांनी वर्तविली आहे.