Coronavirus: दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे झाले, मृतांचे प्रमाणही घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 10:01 AM2021-06-01T10:01:52+5:302021-06-01T10:02:05+5:30
Coronavirus in India: आज जून महिन्याच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे.
नवी दिल्ली - एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी आणि कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरल्याचे चित्र आहे. आज जून महिन्याच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख २७ हजार नवे रुग्ण सापडले असून, २ हजार ७९५ जणांचा मृत्यू झाला आहे. (India reports 1,27,510 new COVID19 cases, 2,55,287 discharges & 2,795 deaths in last 24 hrs)
आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात कोरोनाच्या १ लाख २७ हजार ५१० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजेच या २४ तासांत तब्बल २ लाख ५५ हजार २८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.
तर गेल्या अनेक दिवसांनंतर देशात प्रथमच कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूंचा आकडा तीन लाखांच्या खाली आला आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये २ हजार ७९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
India reports 1,27,510 new #COVID19 cases, 2,55,287 discharges & 2,795 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
— ANI (@ANI) June 1, 2021
Total cases: 2,81,75,044
Total discharges: 2,59,47,629
Death toll: 3,31,895
Active cases: 18,95,520
Total vaccination: 21,60,46,638 pic.twitter.com/AgS0JDgEGH
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २ कोटी ८१ लाख ७५ हजार ४४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत त्यापैकी २ कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३ लाख ३१ हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्याच्या घडीला १८ लाख ९५ हजार ५२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंत देशातील २१ कोटी ६० लाख ४६ हजार ६३८ जणांना कोरोनावरील लस मिळाली आहे.