Covaxin For Kids : २ ते ६ वर्षांच्या मुलांवर दिल्लीतील AIIMS मध्ये सुरू होणार पुढील आठवड्यात Covaxin ची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 10:18 AM2021-07-23T10:18:43+5:302021-07-23T10:20:33+5:30
Coronavirus Vaccine: सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसत आहे. Covaxin मुलांवरील दुसऱ्या डोसची चाचणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. परंतु आता दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. अशातच आता २ ते ६ वर्षे या वयोगटातील मुलांच्या कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची चाचणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या वयोगटातील काही मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. स्वदेशी कंपनी भारत बायोटेक मुलांवर पहिल्या अँटी कोरोना लसीची चाचणी करत आहे. दिल्लीत ६ ते १२ या वयोगटातील मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे.
सहा ठिकाणी चाचण्या
सध्या देशात २ ते १८ या वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी सुरू आहे. दिल्लीसह देशातील सहा सेंटर्सवर ५७५ मुलांवर ही चाचणी करण्यात येत आहे. सध्या पहिला डोस त्यांना देण्यात आला असून दुसरा डोस देण्यास सुरूवात झाली आहे. परंतु याची माहिती मिळण्यास सप्टेंबर महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच ही लस इतर मुलांना दिली जाऊ शकते का नाही याचा निर्णय घेतला जाईल.
तीन टप्प्यांत चाचणी
लहान मुलांवर त्यांच्या वयानुसार लसीची तीन टप्प्यांत चाचणी घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८, तर दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ आणि तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींची मुलांवरील चाचणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती यापूर्वी केंद्र सरकारनं उच्च न्यायालयाला दिली होती.