Coronavirus : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र अलर्ट; परिस्थिती पाहून सूट देण्याच्या राज्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 10:48 AM2021-06-20T10:48:44+5:302021-06-20T10:51:41+5:30
Coronavirus Third Wave : अनेक राज्यांनी सूट दिल्यानंतर रस्त्यांवर दिसून येत आहे गर्दी. कोरोनाविषयक सूचनांचं पालन होत नसल्याचं चित्र.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. यानंतर अनेक राज्यांमध्ये पुन्हा निर्बंध लादण्यात आले होते. दरम्यान, अनेक राज्यांनी निर्बंध लागू केल्यानंतर रुग्णाच्या संख्येत मोठी घटही दिसून आली. परंतु अनेक लोकांच्या कामावरही याचा परिणाम झाला. यानंतर रुग्णसंख्या कमी होत असल्यानं अनेक राज्यांनी पुन्हा सूट देण्यास सुरूवात केली. परंतु सूट दिल्यानंतर पुन्हा एकदा अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.
केंद्र सरकारनं रस्त्यांवरील वाढती गर्दी पाहता पुन्हा एकदा राज्यांना इशारा दिला आहे. तसंच ही सूट योद्य ती काळजी घेऊन विचारपूर्वक दिली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्रानं राज्य सरकारांना कोविड अॅप्रोप्रिएट बिहेविअरची पाच स्तरीय रणनितीचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्ट, ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरणाला चालना देण्याच्याही सूचना केल्या आहेत.
केंद्राचं राज्यांना पत्र
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राज्यांना टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या रणनितीचा वापर करण्यास सांगितलं आहे. तसंच टेस्टींग रेट कमी होऊ नये अशाही सूचना केल्या आहेत. याशिवाय राज्यांमध्ये लसीकरणही वाढवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
"संबंधित ठिकाणची परिस्थिती पाहूनच निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली पाहिजे. बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर सूट देणं आवश्यक आहे, परंतु सतर्कता बाळगणंही आवश्यक आहे. सूट देताना कोरोना नियमांचं पालन केलं जाणंही आवश्यक आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लसीकरण हे आवश्यक आहे. नियमांचं पालन केलं जातंय का नाही यासाठी देखरेख ठेवणंही आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आणि बंद जागांवर योग्य वेंटिलेशन या गोष्टीही आवश्यक आहे," असं गृह सचिवांनी नमूद केलं.
... तर ६-८ आठवड्यात तिसरी लाट
देशात येत्या सहा ते आठ आठवड्यांच्या आत कोरोना साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं ‘एम्स’चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. प्रतिबंधक निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पुन्हा निष्काळजीपणे वावरू लागले आहेत, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
"कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कालावधीत लोकांनी प्रतिबंधक नियमांचे नीट पालन केले नाही. या हलगर्जीपणामुळे कोरोना संसर्गास अधिक वाव मिळाला व रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर बहुतांश लोक प्रतिबंधक नियम नीट पाळताना दिसत नाहीत. अनेक ठिकाणी पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. असेच चित्र राहिले तर ही साथ आणखी वेगाने पसरू शकते," असं गुलेरिया म्हणाले.