CoronaVirus News: ...अन् भारत 'त्या' यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला; नावावर नकोसा विक्रम नोंदला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 10:45 PM2020-05-28T22:45:52+5:302020-05-28T22:48:00+5:30
कोरोना रुग्णांच्या यादीत भारत जगात नवव्या स्थानावर
नवी दिल्ली: देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असूनही कोरोना बाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६० हजारांच्या पुढे गेली आहे. यामुळे भारताच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदला गेला आहे. आशियातील देशांचा विचार केल्यास कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या जगातील केवळ आठच देशांमधील कोरोना रुग्णांचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे.
worldometers.info हे संकेतस्थळ जगभरातल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी देतं. भारतात सध्याच्या घडीला कोरोनाचे १ लाख ६० हजार ३१० रुग्ण आहेत. आशिया खंडात इतकी रुग्णसंख्या कोणत्याही देशात नाही. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आतापर्यंत १ लाख ५८ हजार ३३३ रुग्ण सापडल्याची माहिती दिली आहे. यातील ६७ हजार ६९१ जण बरे झाले असून ४ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मंत्रालयानं दिली.
देशात सध्या ८६ हजार ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ५६ हजार ९५८ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडू (१८ हजार ५४५), दिल्ली (१५ हजार ५२७), गुजरात (१५ हजार १९५) या राज्यांचा क्रमांक लागतो.
आशियाई देशांचा विचार केल्यास भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तुर्कस्तान (१ लाख ५९ हजार ७९७), इराण (१ लाख ४३ हजार ८४९), चीन (८२ हजार ९९५), सौदी अरब (८० हजार १८५), पाकिस्तान (६१ हजार २२७), कतार (५० हजार ९१४), बांगलादेश (४० हजार ३२१), सिंगापूर (३३ हजार २४९), संयुक्त अरब अमिरात (३२ हजार ५३२) यांचा क्रमांक लागतो.
'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर
'लेटर्स टू मदर'; मोदींनी आईला लिहिलेल्या पत्रांवरील पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला