Coronavirus in India : भारतातील मित्रांसाठी आम्ही तयार; ऑस्ट्रेलियानंही पुढे केला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:15 PM2021-04-24T20:15:05+5:302021-04-24T20:16:46+5:30
सध्या देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. गेल्या काही दिवसांपासून दिवसाला होत आहे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून तब्बल तीन लाखांच्या वर रुग्णांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडत आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांचीही गरज भासत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी काही देशांनी हात पुढे केला आहे. यापैकी ऑस्ट्रेलियानंदेखील भारताला मदतीचं आश्वासन दिलं आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतासोबत ऑस्ट्रेलियाही उभा आहे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी सांगितलं.
"भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसाठी त्यांच्यासोबत उभा आहे. भारत किती खंबीर आहे हे आम्हाला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी या जागतिक आव्हानावर एकत्र काम करत राहू," असं स्कॉट मॉरिसन म्हणाले.
Australia stands with our friends in India as it manages a difficult second #COVID19 wave. We know how strong and resilient the Indian nation is. PM Narendra Modi and I will keep working in partnership on this global challenge: Australian PM Scott Morrison pic.twitter.com/RLuUyiKWHu
— ANI (@ANI) April 24, 2021
यापूर्वी चीन आणि फ्रान्सनंही केला होता मदतीसाठी हात पुढे
भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ट्वीट केला केला गोता. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत," असा संदेश इमॅन्युअल मॅक्राँ यांनी दिला होता.
अमेरिकेनंतर भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. "चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे," असं त्यांनी उत्तर देताना सांगितलं. "भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे याची माहिती मिळाली आहे. तसंच याचा सामना करण्यासाठी आणखी वैद्यकीय वस्तूंचा पुरवठाही कमी होत आहे. आम्ही भारताला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल," असंही वांग म्हणाले.