Coronavirus: कोरोनावरील भारतीय बनावटीच्या लसीची होणार माणसांवर चाचणी; केंद्र सरकारची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:36 AM2020-07-01T03:36:09+5:302020-07-01T03:36:22+5:30
कोव्हाक्सिन लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय), सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असताना, आजारावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्यावहिल्या प्रतिबंधक लसीच्या माणसांवर चाचण्या करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही)च्या सहकार्याने भारत बायोटेकने कोव्हाक्सिन ही लस बनविली आहे.
काही भारतीय कंपन्यांनी या आजारावरील प्रतिबंधक लस बनविण्यासाठी प्रयोग सुरू केले. असेच प्रयत्न अमेरिकेसह इतर काही देशांतही सुरू आहेत. भारत बायोटेक या कंपनीने हैदराबाद येथील जिनोम व्हॅली येथे तिच्या प्रकल्पामध्ये कोव्हाक्सिन ही प्रतिबंधक लस तयार केली आहे.
कोव्हाक्सिन लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय), सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार कोव्हाक्सिनच्या माणसांवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या जुलै महिन्यात सुरू होतील. या लसीच्या प्राण्यांवर केल्या गेलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष भारत बायोटेक कंपनीने केंद्र सरकारला सादर केले होते. त्याचा अभ्यास करून केंद्र सरकारने ही परवानगी दिली आहे.
आॅक्सफर्ड प्रयोग जगात अव्वल
अनेक देशांत कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याबाबत आॅक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेन्सा यांच्या वतीने सुरू असलेले प्रयोग जगात अव्वलस्थानी आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. त्यानंतर अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने कोरोना लस बनविण्यासाठी केलेल्या प्रयोगांचा क्रमांक लागतो. आॅक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेन्सा बनवीत असलेल्या लसीचा माणसांवरील चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण केला. मॉडर्ना कंपनीच्या लसीचा माणसांवरील चाचणीचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होईल.