Coronavirus : भारतातील रेल्वे १९७४ नंतर प्रथमच झाली बंद!, युद्धकाळातही सुरू होत्या गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:18 AM2020-03-25T01:18:00+5:302020-03-25T05:35:59+5:30
coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. सध्या केवळ मालगाड्याच सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे.
मुंबई : भारतातील रेल्वेसेवा आतापर्यंत एकदाच पूर्णपणे बंद राहिली होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ रोजी सुरू झालेला संप २७ मेपर्यंत म्हणजे तब्बल २० दिवस सुरू होता. त्या काळात देशभरातील रेल्वे बंद होती. त्यानंतर पहिल्यांदाच देशात रेल्वेगाड्या बंद झाल्या आहेत आणि तो निर्णय कोरोनामुळे केंद्र सरकारनेच घेतला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. सध्या केवळ मालगाड्याच सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे. पण पॅसेंजर, एक्स्प्रेस यांपासून उपनगरी गाड्या तसेच मेट्रो रेल्वेही आता बंद आहे.
लॉकडाउन असूनही लोक कोरोनाबाबत हवे तितके गंभीर नसल्याने रेल्वेने ट्विटर अकाउंटवरून देशातील लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करताना आतापर्यंत रेल्वे कधीच थांबली नव्हती, महायुद्धाच्या काळातही रेल्वेगाड्या धावत होत्या, याचा उल्लेख केला आहे.
युद्धकाळातही रेल्वे बंद झाली नाही, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, आपापल्या घरातच राहा, असे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेचा हा संदेश समाजमाध्यमांवर खूपच व्हायरल झाला आहे. सध्या रेल्वे बंद असली तरी लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. संचारबंदी असूनही त्यांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आले नाही, असाच याचा अर्थ लावला जात आहे.
आपत्तीतही सुरूच
मुंबईत बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, अनेकदा प्रचंड पाऊ स झाला. पण रेल्वेची उपनगरी सेवा सुरूच राहिली. ती बंद करावी लागते, याचा अर्थच परिस्थिती अतिशय कठीण आहे. त्यामुळे आपण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि घरीच थांबावे, असे मेसेज रेल्वेच्या ट्विटरचा उल्लेख करून एकमेकांना पाठविले जात आहेत.