CoronaVirus News: मे महिन्यात देशाची निर्यात घटली; व्यापार तूट झाली कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:22 AM2020-06-17T01:22:00+5:302020-06-17T01:22:23+5:30
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे देशाच्या आयात-निर्यात व्यापाराबाबतची आकडेवारी जाहीर
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे विविध देशांमधील कमी झालेल्या मागणीमुळे मे महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये ३६.४७ टक्के अशी मोठी घट झाली आहे. निर्यातीमध्ये घट होणारा हा सलग तिसरा महिना आहे. त्याचप्रमाणे देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तूट यामुळे कमी झाली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे सोमवारी देशाच्या आयात-निर्यात व्यापाराबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामधून वरील बाब स्पष्ट झाली आहे. मे महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये ३६.४७ टक्के एवढी घट होऊन १९.०५ अब्ज डॉलरच्या वस्तू विविध देशांकडे पाठविण्यात आल्या. त्याचबरोबर या काळामध्ये देशाच्या आयातीतही ५१ टक्के अशी मोठी घट झाली आहे. मे महिन्यात २२.२ अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात करण्यात आली. या महिन्यामध्ये देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तोटा कमी होऊन तो ३.१५ अब्ज डॉलरवर आला आहे. मागील वर्षी याच महिन्यात हा तोटा १५.३६ अब्ज डॉलर इतका होता.
मे महिन्यात देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंपैकी तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, लोह खनिज आणि औषधे यांचा अपवाद वगळता अन्य २६ प्रमुख वस्तूंमध्ये घट झालेली आहे. दागिने आणि रत्नांच्या निर्यातीमध्ये ६८.८३ टक्के, चामड्याच्या वस्तूंमध्ये ७५ टक्के, पेट्रोलियम उत्पादनांमध्ये ६८.४६ टक्के, इंजिनिअरिंग उत्पादनांमध्ये २४.२५ टक्के तर तयार कपड्यांच्या निर्यातीमध्ये ६६.१९ टक्के एवढी घट झाली आहे. विविध देशांमधील लॉकडाऊनचा हा परिणाम होता.
खनिज तेल, सोन्याच्या आयातीमध्ये घट
मे महिन्यात देशात होत असलेल्या खनिज तेलाच्या आयातीत ७१.९८ टक्के घट झाली असून, त्यासाठी ३.४९ अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. मागील वर्षाच्या याच महिन्यात खनिज तेलाच्या आयातीवर १२.४४ अब्ज डॉलर खर्च झाले होते. याशिवाय खनिज तेलवगळता अन्य उत्पादनांची आयात ४३.१३ टक्क्यांनी घटली आहे. सोने, चांदी, वाहने, कोळसा, खते, यंत्रसामग्री यांच्यासह एकूण २८ वस्तूंची आयात कमी झाली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात सोन्याच्या आयातीमध्ये ९८.४ टक्के एवढी प्रचंड घट झाली आहे.