CoronaVirus झटका जोरात बसणार; भारताचा विकास दर निम्म्याने घटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 05:22 PM2020-03-27T17:22:27+5:302020-03-27T17:25:42+5:30
मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस या रेटिंग एजन्सीने चीन सोडल्यास भारत, अमेरिकेचा विकास दर घटणार असल्याचा अंदाज वर्तविला होता.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रकोप हळूहळू वाढू लागला आहे. भारतात २१ दिवस लॉ़कडाऊन असल्याने उद्योग धंद्यांवर मोठा परिणाम होणार आहे. याचा थेट फटका भारताच्या विकास दराला बसणार असून मूडीजने धक्कादायक अंदाज जाहीर केला आहे.
मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस या रेटिंग एजन्सीने चीन सोडल्यास भारत, अमेरिकेचा विकास दर घटणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. आज मुडीजने भारताचा २०२० वर्षाचा जीडीपीचा अंदाज ५.३टक्क्यांवरून केवळ २.५ टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वीच मूडीजने भारताचा विकासदर ५.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होणार आहेत. याचा फटका सर्वच देशांना बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मूडीजने त्यांच्या ‘ग्लोबल मायक्रो आउटलुक 2020-21’ मध्ये म्हटले आहे की, अंदाजित विकास दरामध्ये भारतात २०२० मध्ये मोठी घसरण होणार आहे. यामुळे २०२१ मध्ये मागणी आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा आधीपेक्षा अधिक पटींनी प्रभावित होण्याची शक्यता आहे. भारतातील बँका आणि वित्तीय कंपन्यांकडे रोखीची मोठी कमतरता असल्याने आधीच कर्ज देण्यासाठी अडचणी येत आहेत.