CoronaVirus News: भारताची नवी पेपर टेस्ट गेम चेंजर ठरणार; कोरोना युद्धात मोलाची कामगिरी बजावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 01:55 AM2020-10-07T01:55:56+5:302020-10-07T07:25:48+5:30
CoronaVirus Paper Test: गरोदरपणा आहे की नाही याच्या चाचणीचा निकाल जितक्या वेगाने मिळतो तेवढ्या वेळात या चाचणीचा निकाल मिळेल.
नवी दिल्ली : भारतातील वैज्ञानिकांच्या तुकडीने कोरोना विषाणूची बाधा झाली की नाही हे खूप वेगाने सांगणारी अत्यंत कमी खर्चाची कागदआधारीत चाचणी विकसित केली आहे. गरोदरपणा आहे की नाही याच्या चाचणीचा निकाल जितक्या वेगाने मिळतो तेवढ्या वेळात या चाचणीचा निकाल मिळेल.
ही चाचणी कशी काम करेल हे बीबीसीचे सौतिक बिस्वास आणि कृतिका पाथी यांनी सांगितले. जीन एडिटिंग टेक्नॉलॉजीवर म्हणजेच ‘क्रिस्पर’वर आधारीत या चाचणीला प्रसिद्ध भारतीय काल्पनिक हेराचे नाव दिले गेले आहे. शास्त्रज्ञांनी या चाचणीचे ‘फेलुदा’ नावाचे किट ५०० रूपये खर्चात (६.७५ डॉलर्स/५.२५ पौंड) तासाभरात चाचणीचा निकाल देईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या फेलुदाची निर्मिती भारतातील आघाडीचा टाटा समूह करेल व ती जगातील बाजारातील पहिली कागदआधारीत कोविड-१९ चाचणी उपलब्ध असू शकेल. ‘ही साधीसोपी, नेमकी, विश्वसनीय व कमी खर्चाची चाचणी आहे,’ असे भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांनी बीबीसीला सांगितले.