CoronaVirus : चिंता वाढली! गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 39 जणांचा मृत्यू, 1118 नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:36 PM2020-04-15T18:36:42+5:302020-04-15T18:37:44+5:30
CoronaVirus :देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११९३३ वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १११८ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११९३३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ३९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ३९२ इतकी झाली आहे. तर १३४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India's total number of #Coronavirus positive cases rises to 11,933 (including 10197 active cases, 1344 cured/discharged/migrated and 392 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/UNpPRwfM6o
— ANI (@ANI) April 15, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि. १४) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविणार असल्याचे सांगितले. याशिवाय, २० एप्रिलपासून ज्याठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही, ते ठिकाण एका नियमावलीनुसार लॉकडाऊनमधून वगळण्याची शक्यता नरेंद्र मोदी यांनी वर्तविली होती. त्यानुसार आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
या नियमावलीमध्ये हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, सब यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहे.
याचबरोबर, केंद्र सरकारने या नियमावलीमधून रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती दिल्या आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणे सुद्धा अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करणार येईल, असे या नियमावलीत म्हटले आहे.
जगभरात आतापर्यंत 1,27,147 हून अधिक लोकांचा मृत्यू
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 1,27,147 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 20 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 20,08,164 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 4,86,247 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.