आश्चर्य! कोरोनाग्रस्त महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:58 AM2020-04-05T05:58:10+5:302020-04-05T05:58:37+5:30
कोरोनाग्रस्त गर्भवतीची ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेने केलेली भारतातील ही पहिलीच प्रसूती आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झालेल्या, परंतु त्या आजाराची लक्षणे न दिसणाऱ्या एका महिलेने येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) शुक्रवारी सायंकाळी एका सुदृढ बाळाला जन्म दिला. कोरोनाग्रस्त गर्भवतीची ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेने केलेली भारतातील ही पहिलीच प्रसूती आहे. या स्त्रिला आधीची एक मुलगी आहे.
वयाने तिशीच्या आत असलेली ही महिला ‘एम्स’मधीलच शरीरशास्त्र विभागातील एका निवासी डॉक्टरची पत्नी आहे. या डॉक्टरला, त्यांच्या पत्नीला व भावाला कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात निष्पन्न झाले होते.
स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. नीरजा भाटला यांनी सांगितले की, या महिलेला मुलगा झाला असून दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. बाळाला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत तरी त्याला सतत निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जरा जरी लक्षणे दिसली, तर त्याची चाचणी केली जाईल.
या महिलेची प्रसूतीची अदमासे तारीख उलटून गेली होती. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यापासून तिला ‘एम्स’मध्येच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या महिलेला नियमित आॅपरेशन थिएटरमध्ये न नेता विलगीकरण कक्षातच सर्व सज्जता करून ‘सिझेरियन’ शस्त्रक्रिया केली गेली. विशेष काळजी म्हणून या शस्त्रक्रियेसाठी विविध वैद्यकशाखांच्या तज्ज्ञांसह एकूण १० डॉक्टरांचे विशेष पथक नेमले गेले होते.