दिलासादायक! राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण घटले, पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षाही खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 07:55 AM2021-05-25T07:55:05+5:302021-05-25T07:56:22+5:30
Coronavirus in India: महाराष्ट्राने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. राज्यात नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने घसरत असून एकाही जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर नसल्याचे चित्र आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या घटत असल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. तरीही २३ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही २० टक्क्यांहून जास्त असल्याने चिंता कायम आहे. मात्र, महाराष्ट्राने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. राज्यात नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने घसरत असून एकाही जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर नसल्याचे चित्र आहे.
सध्या देशात ३८२ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आहे. गोवा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, नागालँड, पुदुच्चेरीसह एकूण १३ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांहून अधिक आहे.
महाराष्ट्रात आठवडाभरापूर्वी सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर होता. मात्र, आता एकाही जिल्ह्यात त्यापेक्षा अधिक दर नाही. तसेच २३ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. राज्यात दररोज सुमारे २६ हजार नवे रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाणही बरेच कमी झाले आहे. मात्र, मृत्युदर १.६ टक्के असून त्याबाबत चिंता कायम आहे.
१० टक्के पॉझिटिव्हिटी दर असलेले जिल्हे
दिनांक महाराष्ट्र भारत
४ मे ३५ ५४५
११ मे ३४ ५३३
१७ मे ३३ ४७९
२३ मे २३ ३८२
रुग्ण वाढल्याने चिंता
तामिळनाडूमध्ये ३७ जिल्हे, कर्नाटकचे २९, ओडिशाचे २८, हरयाणाचे १८ आणि पंजाबच्या १४ जिल्ह्यांमध्ये जास्त पॉझिटिव्हिटी दरामुळे चिंता कायम आहे.
दिल्लीतील केवळ २ जिल्ह्यांमध्ये हा दर १० टक्क्यांहून अधिक असल्यामुळे दिलासा मिळाला आहे. दिल्लीतही नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले आहे.