CoronaVirus: कोरोना प्रसाराचा वेग देशात दुप्पट नाही; आरोग्य मंत्रालयाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:15 AM2020-04-23T02:15:31+5:302020-04-23T07:02:01+5:30
देशात दररोज रुग्ण वाढत असले तरी त्यात चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांसारखी मोठी वाढ नाही.
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी इतर देशांच्या तुलनेत आपण कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू दिली नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. देशात दररोज रुग्ण वाढत असले तरी त्यात चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांसारखी मोठी वाढ नाही.
देशात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या वीस हजारांवर गेली होती. दररोज रुग्णांमधे वाढ होत आहे. अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, चीन, इराण, तुर्की, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, नेदरलँड, स्वित्झर्लंड, रशिया, पोर्तुगाल, आॅस्ट्रिया, आयर्लंड आणि इस्राईलमधे ज्या पद्धतीने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली, त्या प्रमाणात भारतात झाली नाही.
रुग्णसंख्येत दुपटीने वाढीची गणितीय पद्धत आहे. रोगाचा फैलाव किती वेगाने आणि कशा पद्धतीने होतो, यावर रोगाच्या फैलावाची तीव्रता ठरविली जाते. नियमितपणे लहान संख्येने रुग्णसंख्येत वाढ होत असल्यास ती सामान्य मानली जाते. कमी कालावधीमधे जर रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यास त्याच प्रमाणात वाढ होत राहिल्यास ती स्थिती अधिक गंभीर मानली जाते. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर रुग्णसंख्या साडेसातशेवरून दीड हजार, दीडवरून तीन हजार आणि तिनाचे सहा हजार अशी रुग्णसंख्येत भारतात वाढ झाली नाही.
जॉन हॉपकीन्स विद्यापीठाने असेच निरीक्षण नोंदविले आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात भारतात अशी वाढ झाली. ही स्थिती पाच दिवस टिकली. इराण, स्पेन, तुर्कीमध्ये दुपटीने वाढ झाली. भारतात दुसऱ्या टप्प्यात दीड हजाराहून ३ हजार रुग्णसंख्या होण्यासाठी अनेक दिवस लागले. मात्र, ब्रिटन, रशिया, पोर्तुगाल, नेदरलँड, ब्राझिल आणि आयर्लंडला अवघे सहा दिवस लागले.
तिसºया टप्प्यात भारताला ३ हजारावरुन सहा हजार रुग्ण संख्या होण्यासाठी पाच दिवसाचा अवधी लागला. आयर्लंडला त्यासाठी ८ दिवस लागले होते.
स्पेनमधे मात्र एका दिवसातच तितक्या रुग्णांची भर पडली. त्यानंतर सहा ते बारा हजारांचा टप्पा भारतात ६ दिवस लागले. केवळ चार देशांनाच त्यासाठी कमी कालावधी लागला. इस्राईलला हा टप्पा गाठण्यासाठी १३, ऑस्ट्रियाला १० आणि पोर्तुगालला ८ दिवस लागले. अमेरिका, जर्मनी आणि चीनने हा टप्पा दोन दिवसांत गाठला होता. अता अमेरिकेत दररोज सरासरी २५-३० हजारांनी रुग्णसंख्या वाढत आहे.