coronavirus : कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने इन्फोसिसची इमारत केली रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 04:29 AM2020-03-15T04:29:38+5:302020-03-15T04:30:54+5:30
इन्फोसिसच्या बंगळुरू येथील विकास केंद्राचे प्रमुख गुरुराज देशपांडे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवून ही माहिती दिली.
बंगळुरू : कोरोना विषाणूचा एक संशयित रुग्ण आढळून आल्यामुळे आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने बंगळुरू शहराच्या उपनगरातील आपली एक इमारत रिकामी केली आहे.
इन्फोसिसच्या बंगळुरू येथील विकास केंद्राचे प्रमुख गुरुराज देशपांडे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवून ही माहिती दिली. ई-मेलमध्ये म्हटले आहे की, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आयआयपीएम इमारत रिकामी केली आहे. आपला एक सदस्य कोविद-१९ विषाणूच्या संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ‘इलेक्ट्रॉनिक सिटी’मध्ये इन्फोसिसच्या विकास केंद्रांच्या अनेक इमारती आहेत. १९९0 पासून कंपनी येथे कार्यरत आहे. येथेच कंपनीचे कॉर्पोरेट भवनही आहे. ८१ एकरवर पसरलेल्या ग्रीन कॅम्पसमध्ये ३0 हजार तंत्रज्ञ काम करतात.
देशपांडे यांनी म्हटले की, केवळ कर्मचाऱ्यांची सुरक्षा निश्चित करणे आणि या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे एवढ्यासाठीच इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजमाध्यमावरून येणाºया अफवा आणि चुकीच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच अशी माहिती कोणीही पसरवू नये. काही आणीबाणीची स्थिती निर्माण झालीच, तर कर्मचाºयांनी कंपनीच्या ग्लोबल हेल्प डेस्कच्या क्रमांकावर संपर्क साधावा.