CoronaVirus कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुुरुवात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:39 AM2020-04-11T06:39:06+5:302020-04-11T06:39:20+5:30
‘आयसीएमआर’च्या ताज्या अहवालावरून निष्कर्ष : केंद्र सरकारकडून मात्र साफ इन्कार
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या दहा दिवसांमध्ये सतत वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे अखेर कोरोना प्रसाराने देशात तिसऱ्या टप्प्यात अर्थात सामूहिक म्हणजेच कम्युनिटी संसर्गात प्रवेश केल्याची भीती व्यक्त होत आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) ताज्या अहवालात हीच भीती वर्तविली आहे. देशात १५ राज्यांत ३६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कात कधीही न आलेले, परदेश प्रवास न केलेले ३९.२ टक्के रुग्ण आढळल्याने सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचा निष्कर्ष या अहवालावरून निघतो. मात्र केंद्राने सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचा स्पष्ट इन्कार केला.
सामूहिक संसर्ग सुरू झाल्यास आरोग्य यंत्रणाच कोलमडून पडण्याची भीती आहे. आता ३६ जिल्हे सील करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. त्यात मुंबई, पुणे, दक्षिण दिल्ली, गाझियाबाद, गुरूग्रामचाही समावेश असल्याचा दावा आयसीएमआरमधील सूत्रांनी केला. बाधितांच्या थेट संपर्कात न आलेल्या वा परदेश प्रवास न केलेल्यांना ही लागण होणे म्हणजेच सामूहिक संसर्गाची सुरुवात असते. लोकसंख्येच्या तुलनेत किती संसर्ग झाला हे समीकरण पॅनडॅमिकमध्ये नसते, असे आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितले.
स्थानिक प्रशासनाने जाहीर केल्यानुसार सध्या रॅँडम चाचणी होत आहे. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे ही लक्षणे असलेल्यांचीदेखील चाचणी केली जात आहे. आधी अशी लक्षणे असलेल्यांना बाधितांच्या संपर्कात आला होता का, परदेश प्रवास केला का, असे विचारल्यानंतर नकारार्थी उत्तर आल्यास कोरोनाची चाचणी केली जात नसे. मात्र आता चाचणीचे निकष बदलल्याने काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
ना परदेशी प्रवास,
ना बाधिताशी संपर्क
च्सध्या देशातील एकूण रुग्णांपैकी ३९.२ टक्के रुग्ण कम्युनिटी संसर्गाच्या श्रेणीत येतात. त्यातील गंभीर श्वसन विकार असलेल्या रुग्णांची संख्या
१.८ आहे. याच गटात कोरोनामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाण जास्त आहे.
च्आयसीएमआरच्या अहवालानुसार ३९.२ टक्के रुग्ण ना बाधितांच्या संपर्कात आले होते ना त्यांनी परदेश प्रवास केला होता. सरसकट काही जणांची विशेषत: गंभीर श्वसन विकार, कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांची तपासणी केल्यास सामूहिक संसर्ग झाला अथवा नाही, हे स्पष्ट होईल. मात्र सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचे या अहवालात कुठेही म्हटले नाही. मात्र आंतरराष्ट्रीय निकषांनुसार देशात सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचे मानले जात असल्याचेही सूत्रांनी म्हटले.
‘प्रसाराचा वेग स्थिर; देशात सामूहिक संसर्ग अद्याप नाही’
नवी दिल्ली : आयसीएमआरच्या अहवालातून सामूहिक संसर्ग भारतात सुरू झाला, असा निष्कर्ष काढू नका. त्यामुळे घबराट पसरेल. घाबरू नका पण सावध राहा, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी कोरोना संसर्गाने तिसºया टप्प्यात प्रवेश केल्याचे वृत्त नाकारले.
आयसीएमआरच्या अहवालात गंभीर श्वसन विकार असलेले कोविड रुग्ण हॉटस्पॉटमधीलच होते. यांची संख्या १.८ टक्के आहे. शिवाय गुरुवारी १६ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची चाचणी केली. त्यात २ टक्के कोविड पॉझिटिव्ह निघाले. यावरून कोरोना प्रसाराचा वेग भारतात स्थिर आहे. कम्युनिटी संसर्ग नाही, यावर त्यांनी भर दिला. परदेश प्रवास व बाधितांच्या संपर्कात आले नाहीत अशांची संख्या ३९ टक्के असली तरी त्यांची माहिती वारंवार तपासली जात असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. लॉकडाउन नसते तर आतापर्यंत देशात १३ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती, असे वृत्त आयसीएमआरच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले. मात्र असा अहवाल नाही, अशी पाहणी केली नसल्याचे लव अगरवाल म्हणाले.