Coronavirus: लॉकडाऊन काळात मोदी सरकारचं मोठं पाऊल; ७ कोटी ९२ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 03:18 PM2020-04-11T15:18:10+5:302020-04-11T15:28:08+5:30
कोरोना महामारीचं संकट पाहता चालू आर्थिक वर्षात पहिला टप्पा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांना आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. देशात ७ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक गरीब वर्गाचे मोठे हाल झाल्याचं दिसून येत आहेत.
कोरोनाच्या या संकटादरम्यान पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात ७ कोटी ९२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या चालू आर्थिक वर्षात १५ हजार ८४१ कोटी निधी केंद्र सरकारने जमा केला आहे. कृषी मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले आहे. या योजनेतंर्गत उच्च उत्पन्नातील शेतकऱ्यांना वगळता सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये हे तीन टप्प्यात दिले जातात. २ हजार रुपयांचे तीन टप्पे वर्षभरात होतात.
कोरोना महामारीचं संकट पाहता चालू आर्थिक वर्षात पहिला टप्पा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात २४ मार्चपासून लागलेल्या निर्बंधामध्ये शेतकरी सन्मान निधी योजनेतील ७ कोटी ९२ लाख शेतकऱ्यांना फायदा पोहचवण्यात आला आहे. त्यांच्या खात्यात १५ हजार ८४१ कोटी जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (पीएम-किसान) योजना के तहत लॉकडाउन अवधि के दौरान, लगभग 7.92 करोड़ किसान परिवारों को अब तक 15,841 करोड़ रुपये की राशि जारी की गई है।#IndiaFightsCoronapic.twitter.com/rXfK3U0hKY
— Narendra Singh Tomar (@nstomar) April 10, 2020
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला होता. गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये दर महिन्याला ५०० रुपये जमा केले जाणार आहेत. जवळपास २० कोटी महिलांना याचा लाभ मिळेल. महिलांच्या जनधन खात्यांमध्ये ५०० रुपये जमा करण्याचे आदेश इंडियन बँक असोसिएशननं (आयबीए) दिले आहेत. ३ ते ९ एप्रिल दरम्यान पैसे बँक खात्यात भरण्याची प्रक्रिया चालेल. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत पुढील तीन महिने महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा होतील. यात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी महिलांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक लक्षात घेण्यात येईल आणि त्यानुसार ३ ते ९ एप्रिल दरम्यान पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास दिला आहे.