coronavirus: आयसीयू खाटा वाढविण्याच्या सूचना, केजरीवालांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:17 AM2021-04-01T05:17:43+5:302021-04-01T05:19:49+5:30
Coronavirus in Delhi : गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांची हजारांवर भर पडत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ३३ खासगी रुग्णालयांना आयसीयु खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- विकास झाडे
नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांची हजारांवर भर पडत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ३३ खासगी रुग्णालयांना आयसीयु खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांसोबत मृत्यूचेही आकडे वाढत आहेत. गेल्या वर्षासारखी स्थिती परत निर्माण होऊ नये, म्हणून केजरीवाल सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडसंदर्भातील आढावा घेतला. तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी आयसीयु आणि सामान्य खाटा उपलब्ध आहेत. मात्र, ज्याप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यानुसार सरकारी रुग्णालयातील खाटाही लवकरच भरल्या जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी, दिल्लीतील बाधितांची संख्या वाढत असली तरी घाबरण्याचे कारण नाही.
याशिवाय दिल्ली विमानतळावर प्रवाशांची रँडमली तपासणी सुरू करण्यात आली आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह येतील, त्यांना विलगीकरणाची सक्ती करण्यात आली असल्याची माहितीही केजरीवाल यांनी दिली.
खाजगी रुग्णालयांत शिल्लक नाहीत आयसीयू बेड
तातडीची गरज म्हणून खासगी रुग्णालयांना २२० कोविड आयसीयु आणि ८३८ सामान्य खाटा वाढविण्यास सांगितले आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे दिल्लीतील १४ खासगी रुग्णालयांतील कोविड आयसीयु खाटा पूर्ण भरलेल्या आहेत. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी खासगी रुग्णालयांत आयसीयु खाटा रिक्त नसल्याचे मान्य केले, त्यामुळेच खाटा वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.