CoronaVirus News: आयटी कंपन्यांना कार्यालये खुली करण्याची नाही घाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:40 PM2020-06-17T23:40:25+5:302020-06-17T23:40:44+5:30
‘वर्क फ्रॉम होम’मुळे कंपन्यांची सर्व कामे सुरळीत सुरू
बंगळुरू : सरकारने लॉकडाऊन उठविले असले तरी बहुतांश आयटी आणि तंत्रज्ञान कंपन्यांना आपली कार्यालये सुरू करण्याची कोणतीही घाई नाही. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे या कंपन्यांची सर्व कामे सुरळीत सुरू आहेत.
जाणकार सूत्रांनी सांगितले की, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची बहुतांश कामे इंटरनेटवरच होतात. शिवाय आता कंपन्यांकडे शक्तिशाली ‘आॅनलाइन कोलाबरेशन’ साधने आली आहेत. त्यामुळे कार्यालये बंद असली तरी कंपन्यांची कामे सुरळीत सुरू आहेत. कंपन्यांच्या उत्पादकतेवर लॉकडाऊनचा कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. त्यामुळे कार्यालये पूर्ववत सुरू करण्यासाठी घाई करण्याची कंपन्यांची तयारी नाही. बहुतांश कंपन्या आणखी कित्येक महिने सध्यासारखेच काम सुरू ठेवण्याचे नियोजन करीत आहेत. काही कंपन्या फिरत्या पद्धतीने (रोटेटिंग) कर्मचाऱ्यांना कार्यालयांत बोलावण्याच्या पर्यायाकडे पाहत आहेत.
अनेक कंपन्यांनी तर कार्यालयात यायचे की नाही, याचा निर्णय कर्मचाऱ्यांवर सोडला आहे. ज्यांना इच्छा आहे ते कार्यालयांत येतील. जे येऊ इच्छित नाहीत, ते घरूनच काम सुरू ठेवतील.
५,५00 तंत्रज्ञ असलेल्या गोल्डमॅन सॅशच्या बंगळुरू येथील तंत्रज्ञान आणि सेवा केंद्रात पुढील आणखी काही महिने केवळ ३0 टक्के कर्मचारी वर्ग काम करणार असल्याचे अपेक्षित आहे. त्यांनाही टप्प्याटप्प्याने बोलावले जाईल. जूनअखेरपर्यंत यासंबंधीचे धोरण ठरविले जाईल. ‘गोल्डमॅन सॅश सर्व्हिसेस’चे भारतातील प्रमुख गुंजन सामंतानी यांनी सांगितले की, कार्यालयात परतणे हा ऐच्छिक मुद्दा आहे. कर्मचारी त्याबाबत निर्णय घेऊ शकतात.