Coronavirus: जुलै-ऑगस्टमध्ये जेईई व नीट परीक्षा होणार; २५ लाख विद्यार्थ्यांची धाकधूक दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 03:50 AM2020-05-06T03:50:53+5:302020-05-06T03:51:13+5:30
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेईई-मेन्स परीक्षा १८ ते २३ जुलैदरम्यान, तर जेईई-अॅडव्हान्स परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाईल
नवी दिल्ली : देशभरातील आयआयटी व अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशांसाठी घेतली जाणारी जेईई व वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतली जाणारी नीट या देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी मंगळवारी जाहीर केल्या. इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांचे पुढील व्यावसायिक शिक्षण या परीक्षांवर अवलंबून असते.
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेईई-मेन्स परीक्षा १८ ते २३ जुलैदरम्यान, तर जेईई-अॅडव्हान्स परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाईल. नीट परीक्षा २६ जुलै रोजी होईल. दोन्ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेतल्या जातात. जेईईसाठी नऊ लाखांहून अधिक तर नीटसाठी १५.९३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वसाधारणपणे जूनमध्ये घेतल्या जाणाºया या दोन्ही प्रवेश परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
फी वाढ नको
- या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम नेहमीपेक्षा कमी करण्यात आल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेसच्या मागे न धावता स्वत: अभ्यास करून परीक्षांची तयारी करावी, असेही आवाहन पोखरियाल यांनी केले. यासाठी सरकारने सुरू केलेल्या स्वयम् व दीक्षा या डिजिटल शिकवण्यांचा फायदा घेता येईल.
- नंतर विद्यार्थ्यांशी व्हिडीओ संवाद साधताना मंत्री म्हणाले की, आयआयटी व एनआयटी या संस्थांनी आगामी शैक्षणिक वर्षात कोणत्याही अभ्यासक्रमाची फी वाढ करू नये, असे त्यांना सुचविण्यात आले आहे. या संस्था स्वायत्त असल्या तरी त्या सरकारची विनंती मान्य करतील, अशी आशा आहे.
- केंद्रीय शिक्षण मंडळांनी घेतलेल्या इयत्ता १० व १२ वी परीक्षांच्या निकालाच्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जातील.