Coronavirus: का रे दुरावा! हॉस्पिटलपासून अवघं १३ किमी घर; गेली ५ महिने डॉक्टर कुटुंबापासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 10:19 AM2020-09-06T10:19:02+5:302020-09-06T10:19:46+5:30
जैन यांच्या मुलीने सांगितले की, माझे वडील हॉस्पिटलमध्ये असल्याने आम्हाला चिंता होती. आम्ही सारखं विचारत होतो तुम्ही घरी कधी येणार?
नवी दिल्ली – संपूर्ण जगावर सध्या कोरोना महामारीचं संकट पसरलं आहे. देशातही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संकटातून लोकांचा जीव वाचवण्यासाठी कोविड योद्धा डॉक्टर्स आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्टरांना अनेक महिने त्यांच्या घरी जाता येत नाही, कारण घरच्यांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव पसरेल अशी भीती त्यांच्या मनात आहे.
डॉक्टर अजीत जैन यांनी सांगितले की, जेव्हा रात्री उशिरा घरी फोन करुन विचारपूस करतो तेव्हा त्यांची मुलगी तुम्ही घरी कधी येणार? असा प्रश्न वारंवार करते. दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरससाठी नोडल अधिकारी गेल्या ५ महिन्यापासून घरी गेले नाहीत. ड्यूटी आणि कुटुंबामध्ये कोरोना पसरू नये यासाठी ते घरापासून दूरच आहेत. हॉस्पिटलपासून फक्त १३ किमी अंतरावर असलेल्या घरी ते पोहचले. तेव्हा मुलींनी दार उघडताच त्यांना मिठी मारली. त्यांच्या पत्नीने त्यांना ओवाळून घरात घेतले. याचा व्हिडीओ बनवला आहे.
डॉ. जैन हे १७ मार्चनंतर पहिल्यांदाच घरी परतले आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त करत केक कापला, एकत्र बसून जेवण केले. मागील १७० दिवसांपासून ते रुग्णालयातच होते. मार्चमध्ये जेव्हा कोरोना संक्रमण वाढण्यास सुरुवात झाली तेव्हा कोविड १९ डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होते त्याचा सामना माणसाने केला आहे. सुरुवातीला माझ्या घरच्यांना कोरोनाची लागण होईल या भीतीने घरी आलो नाही, माझ्या आई-वडिलांचे वय ७५ वर्षाहून जास्त आहे. मी त्यांच्यामुळे चिंतेत होतो, माझ्यामुळे त्यांचे आयुष्य धोक्यात घालू शकत नव्हतो असं त्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसचं संक्रमण असल्यापासून कुटुंबाशी फोनवरुनच संवाद साधत असे. लोकांचा जीव वाचवणं हे माझं प्राधान्य होतं. मी रात्री १-२ च्या सुमारास घरातील लोकांशी फोनवरुन बोलायचो. जैन यांच्या मुलीने सांगितले की, माझे वडील हॉस्पिटलमध्ये असल्याने आम्हाला चिंता होती. आम्ही सारखं विचारत होतो तुम्ही घरी कधी येणार? सुरुवातीला तीन महिने जैन यांना खूप कमी झोप मिळत असे. त्यांचा फोन सातत्याने खणखणत असे. जे कोरोना रुग्ण डॉक्टरांकडे उपचार घेत होते त्यांना जैन यांनी वैयक्तिक नंबर दिला होता. गुरुवारी डॉ. जैन पहिल्यांदा सुट्टी घेऊन घरी परतले होते.