Coronavirus : नुसती सर्दी, खोकला, ताप म्हणजे कोरोना नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:47 AM2020-03-17T06:47:48+5:302020-03-17T06:47:58+5:30
कोरोनाची मुख्य लक्षणे समजून घेतल्यास लक्षात येईल की साधा सर्दी-खोकला म्हणजे कोरोना नाही.
सर्दी खोकला किंवा इतर कुठल्याही कारणाने ताप आला तर कोरोनामुळे आहे का अशी भीती आपल्याला प्रत्येकाला वाटणे सहाजिक आहे. पण कोरोनाची मुख्य लक्षणे समजून घेतल्यास लक्षात येईल की साधा सर्दी-खोकला म्हणजे कोरोना नाही. कोरोनाची मुख्य लक्षणे - कोरडा खोकला, तीव्र स्वरूपाचा ताप त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी श्वास घेण्यास त्रास . यासोबत १ जानेवारीनंतर कोरोनाग्रस्त देशांमध्ये प्रवास किंवा सध्या भारतातील कोरोनाचे निदान निश्चित झालेल्या रुग्णांशी संबंध हा रिस्क फॅक्टर महत्त्वाचा आहे. ताप आणि खोकला इतर कारणांनी असू शकतो. पण कोरोनाग्रस्तांशी संबंध आल्यास व ही लक्षणे असल्यास मात्र आपण सरकारी यंत्रणेशी तपासणीसाठी संपर्क साधायला हवा. अंगदुखी ही कोरोनामध्ये कमी प्रमाणात सर्दी खोकला, फ्लूमध्ये जास्त प्रमाणात असते. तसेच शिंका येणे, नाक गळणे, जुलाब हे कोरोनामध्ये नसते. पण सर्दी, खोकला व फ्लूमध्ये असते.
- डॉ. अमोल अन्नदाते