Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 09:19 AM2020-04-25T09:19:27+5:302020-04-25T09:20:22+5:30
Coronavirus : वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह पोलीसही आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. याच दरम्यान एक महिला पोलीस कर्मचारी आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या बाळाला घेऊन काम करत आहे.
सासाराम - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 23,000 हून अधिक झाली आहे. तर 680 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. अशीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे.
वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह पोलीसही आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. याच दरम्यान एक महिला पोलीस कर्मचारी आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या बाळाला घेऊन काम करत आहे. पूजा कुमारी असं महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्या आपल्या बाळासह आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सासाराम येथील मुख्य चौकात ड्यूटी करणाऱ्या पूजा बिहारपोलिसात कार्यरत आहेत. त्यांना एक 11 महिन्यांचं गोंडस बाळ आहे. कोरोनाचं संकट देशावर असताना त्या दररोज ड्युटीवर येताना आपल्या अकरा महिन्यांच्या बाळालाही सोबत घेऊन येतात आणि आपलं कर्तव्य निभावतात.
पूजा बाळाला कडेवर घेऊन पोलीस आणि आई या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी चोख रितीने बजावत आहेत. '11 महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन ड्यूटी करताना थोडा त्रास होतो, पण आईची माया बाळासाठी अशी अनेक संकट डोक्यावर घेऊ शकते' अशी प्रतिक्रिया पूजा यांनी दिली आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी देखील माहिती मिळताच पूजा कुमारीच्या निष्ठेचं कौतुक केलं आणि बाळाला घेऊन ड्यूटी करू नको असं सांगितलं. मात्र बाळाचा सांभाळ करायला घरात कोणी नसल्याने त्याला सोबत घेऊन ड्यूटी करावी लागत असल्याचं पूजा यांनी सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम
देशावर कोरोनाचं संकट असताना वीजेचं संकट ओढावू नये यासाठी वीज केंद्राचे कर्मचारी काम करत आहेत. याच दरम्यान एक महिला कर्मचारी आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन वीजपुरवठा कक्षात काम करत आहे. प्रगती तायडे असं महिला कर्मचाऱ्याचं नाव असून त्या आपल्या चिमुकलीसह आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. भोपाळच्या कोलार सब-स्टेशनमध्ये टेस्टिंग ऑपरेटर म्हणून त्या काम करतात. वीज केंद्रात येताना त्या आपल्या सहा महिन्यांच्या मुलीलाही सोबत घेऊन येतात आणि आपलं कर्तव्यही निभावतात. 'कठीण प्रसंगातही डॉक्टर, नर्स आणि पोलीस आपापलं कर्तव्य निभावत आहेत. अशा वेळी मी घरी कशी बसू शकते?, कोणाच्याही घरी अंधार पडू नये, यासाठी मला माझं कर्तव्य बजावणं आवश्यक आहे' असं प्रगती यांनी म्हटलं आहे. सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
CoronaVirus: पावसाळ्यात कोविड-१९ ची दुसरी लाट येणार?
CoronaVirus: कोरोना लस येण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार?