Coronavirus एकट्या कनिकामुळे पळता भूई थोडी झाली; लोकांना शोधण्यासाठी १००० जण कामाला लावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:12 PM2020-03-22T12:12:53+5:302020-03-22T12:16:17+5:30
कनिकाने यावेळी अनेकांसोबत हस्तांदोलन केले, गळाभेट घेतली, सेल्फीही काढले. एवढेच नाही तर त्या पार्ट्यांना खाद्यपदार्थ सर्व्ह करणाऱ्या वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत साऱ्यांनाच कोरोनाच्या धास्तीने ग्रासले आहे.
लखनौ : बॉलिवूड गायिका कनिका कपूर गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आणि वादात सापडली आहे. लंडनहून येत तिने थेट हायप्रोफील पार्ट्यांना हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे. कनिकाला कोरोना झाल्याचे कळताच या साऱ्यांबरोबर प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. कारण या पार्ट्यांना केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि बॉलिवूडचे सेलिब्रेटींसह उद्योजक जमले होते.
कनिकाने यावेळी अनेकांसोबत हस्तांदोलन केले, गळाभेट घेतली, सेल्फीही काढले. एवढेच नाही तर त्या पार्ट्यांना खाद्यपदार्थ सर्व्ह करणाऱ्या वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत साऱ्यांनाच कोरोनाच्या धास्तीने ग्रासले आहे. यामुळे एका कनिकामुळे एवढ्या साऱ्या जणांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या कुटुंबीयांपासून शेजारीपाजाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती प्रशासनाला आहे. यामुळे उत्तर प्रदेशचाआरोग्य आणि गृह विभाग चांगलाच पेचात अडकला आहे.
आरोग्य विभागाने कनिकाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्यासाठी आणि तपासणीसाठी तब्बल १०० टीम तयार केल्या आहेत. यामध्ये जवळपास १००० लोकांचा समावेश आहे. त्यांना केवळ एवढेच शोधायचे आहे की, ११ मार्चनंतर कनिकाच्या संपर्कात कोणकोण ले होते. आणि त्यांनी नंतर कुठेकुठे भेट दिलीय.
धक्कादायक बाब म्हणजे कनिकामुळे तिच्या आसपासच्या परिसरामध्ये राहणाऱ्या तब्बल २२००० लोकांची तपासणी करण्यात आली आहे. केंद्राच्या आरोग्या विभागानेच तसे आदेश दिले असून जो कोणी तपासणीमध्ये अडचणी आणेल त्याच्याविरोधात पोलिस कारवाई करण्याच येणार असल्याचे लखनौचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरपाल सिंह यांनी सांगितले.
कनिकासोबत पार्टी करणारे आणि या पार्ट्यांचे आयोजक आदिल अहमद आणि अदीश शेठ यांची राहती घरे सॅनिटाईज करण्यात आली आहेत. घरातील लोकांना पुढील ४८ तास बाहेर न पडण्याची तंबी दिली आहे.
सीसीटीव्ही मदतीला
ताज हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. १४ ते १६ मार्च दरम्यान कनिका या हॉटेलमध्ये थांबली होती. तिने हॉटेलच्या बुफेमध्ये जेवण केले आणि लॉबीमध्ये पाहुण्यांनाही भेटली. धक्कादायक म्हणजे तेव्हा या हॉटेलमध्ये साऊथ आफ्रिकेची टीमही उतरलेली होती.
OMG! संपता संपेना ‘कोरोना पॉझिटीव्ह’ कनिका कपूरचा ड्रामा, नख-यांनी त्रासला हॉस्पीटल स्टाफ
गावाकडे निघालेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश; म्हणाले...
अखेर चीनला उपरती; वुहानमधील 'त्या' डॉक्टरच्या कुटुंबाची मागितली माफी