coronavirus: कर्नाटक राज्य कोरोनाच्या लढाईतही दहावी पास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:51 AM2020-08-31T06:51:52+5:302020-08-31T06:52:13+5:30
कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला.
साडेआठ लाख विद्यार्थी, हवे तेथे परीक्षा, सर्वांसाठी मोफत एसटीची सोय, शिक्षण विभागाकडून पुरेपूर खबरदारी
- वसंत भोसले
कोल्हापूर : गेली अनेक दशके वेळेवर परीक्षा घेणाऱ्या कर्नाटक राज्याला कोरोनाशी लढताना दहावीच्या परीक्षेची फेरआखणी करावी लागली आणि अशाही परिस्थितीत परीक्षा घेऊन एका महिन्यात निकाल जाहीर केला. नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे अर्ज दाखल करून घेऊन १५ सप्टेंबरच्या पुरवणी परीक्षेची तयारीदेखील पूर्ण झाली आहे.
कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दरवर्षी बारावीची परीक्षा ४ मार्च, तर दहावीची परीक्षा २६ मार्चला सुरू करण्यात येते. बारावीची इंग्रजी वगळता सर्व विषयांची परीक्षा पूर्ण झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी इंग्रजीचा पेपर १९ जुलैला होऊन निकालही जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेचे फेरवेळापत्रक जाहीर करण्यात आले. दक्षिणेतील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूने अद्याप परीक्षा घेतलेल्या नाहीत. केरळने २६ ते ३१ मे दरम्यान परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला.
कर्नाटकाने दहावीच्या परीक्षेची जंगी तयारी केली. परीक्षा केंद्रे वाढविली. प्रत्येक मुला-मुलींस जवळच्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येईल, असे जाहीर केले. एका वर्गात केवळ २४ विद्यार्थी बसवून शारीरिक अंतराचा नियम पाळण्यात आला. परीक्षेला किमान दोन तास आधी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. सर्वांचे तापमान पाहणे, सॅनिटायझेशन करणे, मास्क नसेल तर देणे, आदी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. आजाराची लक्षणे आढळून आल्यास स्वतंत्र खोलीत बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेला बसणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक प्रवास करण्यासाठी राज्यभर मोफत बससेवा उपलब्ध करून दिली होती.
प्रत्येक गावातील मुला-मुलींना परीक्षा केंद्राची निवड करायला सांगितले. आॅनलाईनवर वेळापत्रक देण्यात आले. परीक्षा केंद्र, नाव आणि नंबर मोबाईल तसेच अॅपवर कळविण्यात आले. प्रवासाची गरज असल्याची माहिती जमा करून त्या त्या ठिकाणी बस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
शिक्षण खात्याशिवाय पोलीस कर्मचारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी, स्काऊट तसेच होमगार्डस्, आदींची मदत घेण्यात आली. प्रत्येक मुलाची तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. हसन जिल्ह्यातील अलकेरी गावच्या एका परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला अन्यथा संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडली. २५ जून ते ४ जुलैअखेर परीक्षा पार पडली आणि १० आॅगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात परीक्षा घेण्यास विरोध केला जात असतानाच आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्याने मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या जोराच्या संक्रमण काळातच पूर्ण खबरदारी घेत परीक्षा पार पाडली.