CoronaVirus : विदेशातून आलेल्या प्रवाशांवर करडी नजर ठेवा, सर्व राज्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:36 AM2020-03-28T02:36:31+5:302020-03-28T05:46:29+5:30
CoronaVirus : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून निगराणी ठेवणे जरुरी आहे, अशा आंतरराष्टÑीय प्रवाशांची संख्या आणि प्रत्यक्षात निगराणीत असलेल्या प्रवाशांच्या संख्येत तफावत दिसते, असे गौबा यांनी या पत्रात म्हटले आहे.
नवी दिल्ली : लॉकडाऊनआधी विदेशातून भारतात आलेले एकूण प्रवासी आणि कोविड-१९ संसर्गामुळे प्रत्यक्षात निगराणीत ठेवण्यात आलेल्या प्रवाशांत तफावत दिसते. यामुळे कोविड-१९ रोगाचा प्रसार रोखण्यासाठीचे प्रयत्न धोक्यात येऊ शकतात. कारण भारतात कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तींचा इतिहास आंतरराष्ट्रीय प्रवासाचा आहे; तेव्हा विदेशातून भारतात आलेल्या सर्व प्रवाशांवर निगराणी ठेवण्यात यावी, असे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून निगराणी ठेवणे जरुरी आहे, अशा आंतरराष्टÑीय प्रवाशांची संख्या आणि प्रत्यक्षात निगराणीत असलेल्या प्रवाशांच्या संख्येत तफावत दिसते, असे गौबा यांनी या पत्रात म्हटले आहे.
कोरोना साथीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांत भारतात आलेल्या सर्व आंतरराष्टÑीय प्रवाशांवर लक्ष ठेवणे सुरू केले. कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवणे महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेही ही निगराणी अत्यंत महत्त्वाची असल्याने सातत्याने निक्षून सांगितले आहे. तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलण्यास सांगितले आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार अशा प्रवाशांवर तात्काळ निगराणीखाली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करून तातडीने ठोस कृती करावी.
- २३ मार्च २०२० पर्यंत विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले. भारताने १८ जानेवारी २०२० पासून विमानतळावर आंतरराष्टÑीय प्रवाशांची तपासणी करणे सुरू केले. निगराणीखाली असलेल्या या १५ लाखांहून अधिक प्रवाशांचा तपशील स्थलांतर विभागाने सामायिक केला आहे.