CoronaVirus : जागतिक सहकार्याचा दृष्टिकोन मानवकेंद्रित ठेवा; पंतप्रधान मोदी यांचे जी-२० शिखर परिषदेत प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:46 AM2020-03-27T02:46:15+5:302020-03-27T05:38:50+5:30
CoronaVirus : कोरोना रोगाच्या जगव्यापी साथीमुळे सार्वजनिक आरोग्यासोबत अर्थव्यवस्थेवर महासंकट ओढवले आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीने जगावर ओढवलेले महासंकट पाहता आर्थिक उद्दिष्टांऐवजी जागतिक समृद्धी आणि सहकार्याचा दृष्टिकोन मानवकेंद्रित ठेवण्याची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० शिखर परिषदेत केले. वैद्यकीय संशोधन आणि विकासाच्या लाभाचे खुल्या दिलाने सहभागीदार होण्याचे तसेच अनुकूल, प्रतिसादात्मक आणि मानवी आरोग्यसेवा प्रणाली विकसित करण्याचे आवाहनही जी-२० देशांच्या शिखर परिषदेत केले.
कोरोना रोगाच्या जगव्यापी साथीमुळे सार्वजनिक आरोग्यासोबत अर्थव्यवस्थेवर महासंकट ओढवले आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाण्यापासून वाचविण्यासाठी समन्वयातून कोणती ठोस पावले उचलणे जरूरी आहे, यावर जी-२० देशांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करीत महत्त्वाचे उपाय सुचिवले.
शिखर परिषदेच्या समारोपानंतर जी-२० नेत्यांनी निवदेन जारी करून कोरोना रोगाच्या साथीचा जागतिक समन्वयातून लढा करण्याचे, तसेच जागतिक अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी, व्यापार विस्कळीत होण्याचे प्रमाण कमी राखत जागतिक सहकार्याचे आवाहन केले.
सौदी अरेबियाने जी-२० ची विशेष शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरब नरेशांना धन्यवाद दिले. जी-२० व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जग कोरोनामुळे आर्थिक आणि सामजिक पतनाने डगमगले आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी नवीन आपत्ती व्यवस्थापन पद्धत विकसित करणे जरूरी आहे. या साथीमुळे होणारे धक्कादायक परिणाम ध्यानात घेऊन शक्तिशाली देशांनी काम करावे, तसेच नव्या जगाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शक्तिशाली जी-२० देशांना केले.
या शिखर परिषदेत कोरोना विषाणूंचे उगमस्थान किंवा चीनवर चर्चा करण्यात आली नाही. तथापि, या महासंकटाचा समन्वय आणि सहकार्याने मुकाबला करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. कोरोना विषाणूंच्या प्रसारासाठी कोणावरही खापर फोडण्याचा प्रयत्न झाला नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जी-२० देशांच्या नेत्यांनी या शिखर परिषदेत सहभाग घेतला.
कोरोनाविरुद्ध जागतिक युद्ध छेडण्याचे आवाहन
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोनाविरुद्ध पूर्णत: जागतिक युद्ध छेडण्याचे आवाहन केले. विषाणू कोणतीही सरहद्द बघत नाही. आम्ही ज्याच्याशी लढत आहोत, तो आमचा शत्रू आहे. जगाने आजवर पाहिले नाही, अशा एकजुटीने काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या साथीला आळा घालत लोकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्याचे जी-२० देशांच्या नेत्यांनी मान्य केले.