CoronaVirus: केंद्राच्या आक्षेपानंतर केरळने शिथिलीकरण नियम बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:46 AM2020-04-21T00:46:04+5:302020-04-21T00:46:15+5:30
नियमांना केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर केरळ सरकारने केंद्राच्या मार्गदर्शिकेनुरूप फेरबदल केले.
नवी दिल्ली : कोरोना साथीचा प्रसार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेल्या १४ पैकी सात जिल्ह्यांमध्ये ‘लॉकडाऊन’चे निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यासाठी केलेल्या नियमांना केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर केरळ सरकारने केंद्राच्या मार्गदर्शिकेनुरूप फेरबदल केले.
आधी केलेल्या नियमांनुसार शिथिलीकरण सोमवारी सकाळी लागू होताच केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी केरळचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्याने केलेले नियम केंद्र सरकारने ५ एप्रिल रोजी जारी केलेल्या मार्गदर्शिकेचे अनेक बाबतींत उल्लंघन करणारे असल्याचा आक्षेप घेऊन शिथिलीकरणाच्या जास्तीच्या बाबी तात्काळ रद्द कराव्यात, असे सुचविले.
केंद्राने ज्यास आक्षेप घेतला होता त्यात आंतरजिल्हा प्रवासास परवानगी देणे, सम व विषम नंबर प्लेटच्या खासगी वाहनांना एक दिवसाआड परवानगी देणे, दुचाकी वाहनावर मागील सीटवर बसून प्रवास करू देणे, उपाहारगृहे, केशकर्तनालये, इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुरुस्तीची दुकाने पुन्हा सुरू करणे अशा बाबींचा समावेश असल्याचे समजते.
काही भागांमध्ये निर्बंध शिथिल करून केरळ जनजीवन पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आजपासून पाऊल टाकत आहे. अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी सावध राहण्याची व सर्व सुरक्षा उपाय पाळणे गरजेचे आहे.
-पिनराय विजयन, मुख्यमंत्री केरळ