CoronaVirus वाराणसीतून खूशखबर! तासाभरात कोरोना चाचणीचा निकाल लागणार; वैज्ञानिकांना मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 08:59 PM2020-03-30T20:59:37+5:302020-03-30T21:05:14+5:30
किटचा खर्च परदेशी किटपेक्षा निम्म्याने कमी होणार आहे.
वाराणसी : जिवघेण्या कोरोना व्हायरसवर अद्याप औषध सापडलेले नाहीय. तसेच परदेशी किटवर अवलंबून राहिल्याने कोरोनाबाधित असल्याचे चाचणीचे निकालही विलंबाने मिळत आहेत. पुण्यातील डॉक्टर महिलेने दोन-अडीज तासांत कोरोनाची चाचणी करणारे किट बनविले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातून आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. तेथील महिला वैज्ञानिकांनी केवळ तासाभरात कोरोनाची टेस्ट करणारे किट बनविले आहे.
महत्वाचे म्हणजे या किटचा खर्च परदेशी किटपेक्षा निम्म्याने कमी होणार आहे. वारणसीतील काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या तीन महिला संशोधकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे किट बनविले आहे. भारतीय पेटंट कार्यालयानेही तेवढ्याच तत्परतेने २४ तासांत या किटचा पेटंट बनविण्यास मान्यताही दिली आहे. यामुळे हे किट लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.
बीएचयूच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (आयएमएस) आण्विक आणि मानवी जनुकीयशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका गीता राय यांनी आपल्या प्रयोगशाळेत संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीने कोविड -१९ चे १००% अचूक निकाल देणारे तंत्र विकसित केले आहे. हे तंत्र कोरोना विषाणूच्या प्रथिनांच्या रचनेवर आधारित आहे. देशात विकसित झालेली ही अशा प्रकारची पहिली किट आहे. या तंत्राने लहान पीसीआर मशीनमधून चुकीचा अहवाल येऊ शकत नाही. या संशोधनामध्ये डॉली दास, खुशबू प्रिया आणि हीरल ठक्कर यांनीही मदत केलेली आहे.
राय यांनी या किटच्या उत्पादनासाठी मेडिकल कंपन्यांनी पुढाकार घेण्याची विनंती केलेली आहे. तसेच त्यांनी आठवडाभरात पेटंट मिळणार असल्याचेही म्हटले आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या काही संशोधन संस्थांसोबतही चर्चा केली असून त्यांचीही मदत मागण्यात आली आहे.