CoronaVirus: पोलिसांच्या भीतीने रेल्वे मार्गाने ६०० किमी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:15 AM2020-04-22T02:15:07+5:302020-04-22T02:15:28+5:30
बांधकाम मजुरांचे उलटे स्थलांतर; गावी जाण्यासाठी १४ दिवसांची पायपीट
रायगड (ओडिसा) : लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी मजुरांचे लोंढेच्या लोंढे आपल्या गावी जाण्यासाठी रस्त्यांवर उतरत असल्याचे आणि पायी घरी चालल्याचे वृत्त पाहिले आहे. झारखंड येथील आपल्या गावी जाण्यासाठी आंध्र प्रदेशातून तब्बल सहाशे किलोमीटर अंतर चौदा दिवसांत कापलेल्या मजुरांच्या गटाला ओडिसा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. पोलिसांच्या भीतीने या मजुरांनी रस्त्याचा मार्ग न धरता, चक्क रेल्वे मार्गाचा वापर केल्याचे समोर आले आहे. सोबत घेतलेले बिस्कीट आणि वाटेतील गावातील लोकांनी दिलेल्या अन्नावर त्यांनी दिवस काढल्याची माहिती समोर आली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक ठिकाणी कोणतीही सोय न झाल्याने रोजंदारीवर काम करणारे मजूर आपल्या गावी जात आहेत. रेल्वे, स्थानिक बससेवा बंद असल्याने अनेक मजूर पायीच घरी जाणे पसंत करीत आहेत. मात्र, रस्त्यावर गर्दी करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून काठीचा प्रसाद मिळत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका बांधकाम प्रकल्पावर असलेल्या ११ मजुरांनी रेल्वे मार्गाच्या बाजूने पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला.
मोबाईलवरील गुगल मॅप, रेल्वे मार्गावरील चार्जिंग पॉइंटवर मोबाईल चार्ज करीत कधी घनदाट जंगल, तर कधी डोंगर कपारी आणि रेल्वे बोगद्यातून मार्गक्रमण करीत मजुरांनी १४ दिवसांत तब्बल ६०० किलोमीटर अंतर कापले. ओडिशातील रायगड जिल्ह्यात रेल्वे स्थानकानजीक पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांचा घराचा प्रवास अर्ध्यावर थांबला. पोलिसांनी त्यांना विलगीकरण कक्षात धाडले आहे.
झारखंडमधील लामरी कालन परिसरातील चटनिया गावातील रहिवासी असलेले बांधकाम मजूर प्रमोद कुमार राम म्हणाले, की आम्ही बांधकाम कंपनीमध्ये ७ दिवस काम केल्यानंतर लॉकडाऊन घोषित झाला. आम्ही ठेकेदाराकडे पैसे मागितल्यावर तो पळून गेला. कंपनीने आमची कोणतीही सोय केली नाही. काही दिवस आम्ही काढले.
मात्र, रोजगारच नसल्याने जवळचे पैसेही संपू लागले. अखेर आम्ही घरी जायचा निर्णय घेतला. रस्त्याने गेल्यास पोलिसांचा मार बसेल म्हणून आम्ही रेल्वे मार्गाने जायचा निर्णय घेतला. मोबाईल ट्रॅकिंग सिस्टिीमचा वापर केला. तसेच, रेल्वेने आंध्र प्रदेशात या पूर्वी प्रवास झाला असल्याने रेल्वेमार्ग परिसरातील काही स्टेशन आणि भाग परिचयाचा होता. त्यामुळे अडचण आली नाही.
दररोज दुपारी चार वाजल्यापासून रात्री उशिरा पर्यंत चालून, दररोज सरासरी चाळीस किलोमीटरहून अधिक अंतर पार केले. प्रत्येकाच्या जवळ दोनशे ते तीनशे रुपये होते. त्यातून बिस्कीटचे पुडे खरेदी केले. मार्गात लागणाºया गावातील नागरिकांनीही अन्न दिले. त्यावर गुजराण केली.
-सुनील चौधरी, रा. मांझी गाव,
जि. गढवा, झारखंड