Coronavirus: जून, जुलैमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता; डिस्टन्सिंग पाळा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 04:12 AM2020-05-08T04:12:28+5:302020-05-08T07:09:55+5:30
एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया;लॉकडाऊनमुळे रूग्णसंख्येला बसला आळा
नवी दिल्ली : देशात जून व जुलै या दोन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच या विषाणूच्या संसर्गाची वैद्यकीय चाचणी झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. ही चाचणी झालेल्यांची संख्या कितीही वाढो, मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहिले
पाहिजे.
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, केंद्र सरकारने देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक फायदे झाले आहेत. या साथीमुळे रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असती, त्याला लॉकडाऊनमुळे आळा बसला आहे. कोरोनासाठी खास रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. या आजाराने ग्रस्त रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करावे, याचा अनुभवही डॉक्टरांना मिळाला.
कोरोनाशी लढा चालणार दीर्घकाळ
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा तसेच सॅनिटायझर, हँडवॉशचा सातत्याने वापर करावा. कोरोना विषाणूशी दीर्घकाळ लढावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीमध्येही बदल करावेत.
शॉपिंग मॉल, चित्रपटगृहात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना यापुढे प्रत्येकाने तोंडावर मास्क लावावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे.