Coronavirus: देशात १३ हजारांहून कमी नवे रुग्ण; कोरोना बळींच्या संख्येत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 03:20 AM2021-01-28T03:20:47+5:302021-01-28T07:19:05+5:30
पावणेदोन लाख उपचाराधीन रुग्ण
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचे बुधवारी १२ हजार ७००पेक्षा कमी नवे रुग्ण आढळून आले. अशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. १ कोटी ३५ लाख रुग्ण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.९१ टक्के आहे. बळींची संख्याही घटली असून, आतापर्यंत १ लाख ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी १३,३२० लोक बरे झाले. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १,६८,९,५२७ असून, त्यातील १,३५,९,३०५ जण बरे झाले आहेत. देशात बुधवारी १३७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या १,७६,४९८ असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.६५ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४४ टक्के आहे.
कोरोना बळींपैकी ७० टक्के लोक हे एकापेक्षा अधिक व्याधींनी त्रस्त होते. आतापर्यंत १९ कोटी ३६ लाख लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत २० लाख लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने १ कोटींचा पल्ला १९ डिसेंबरलाच गाठला होता. भारतातील कोरोना रुग्ण, या आजाराचे बळी, उपचाराधीन रुग्ण यांची संख्या अमेरिकेतील अशा रुग्णांपेक्षा कमी आहे.