Coronavirus: गेल्या २४ तासांत ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण; ४० दिवसांतील सर्वांत कमी संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 07:03 AM2022-02-14T07:03:33+5:302022-02-14T07:04:04+5:30
जगभरात कोरोनाचे ४१ कोटी १२ लाख ३४ हजार रुग्ण असून त्यातील ३३ कोटी १३ लाख ७७ हजार रुग्ण बरे झाले.
नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण आढळले आहेत. मागील ४० दिवसांतील ही सर्वाधिक कमी संख्या आहे. नव्या बाधितांप्रमाणेच सक्रिय रुग्णांच्या आकड्यातही घट झाली. सध्या ५ लाख ३७ हजार सक्रिय रुग्ण आहेत. देशात ४४ हजार ८७७ नवे रुग्ण सापडले. याआधी ४ जानेवारी रोजी ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले होते. सलग सातव्या दिवशी दररोज एक लाखांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली.
गेल्या चोवीस तासांत ६८४ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाने आजवर ५ लाख ८ हजार ६६५ जणांनी आपला जीव गमावला. ४ कोटी २६ लाख ३१ हजार ४२१ बाधितांपैकी ४ कोटी १५ लाख ८५ हजार ४२१ जण बरे झाले. एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.२६ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांत सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत ७३,३९८ ने घट झाली. आजवर ९७.५५ टक्के लोक कोरोनामुक्त झाले. दररोजचा व दर आठवड्याचा संसर्ग दर अनुक्रमे ३.१७ टक्के व ४.४६ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.१९ टक्के नोंदला गेला. देशातील नागरिकांना आजवर कोरोना लसीचे १७२.८१ कोटी डोस देण्यात आले.
जगभरात ४१ कोटी १२ लाख रुग्ण
जगभरात कोरोनाचे ४१ कोटी १२ लाख ३४ हजार रुग्ण असून त्यातील ३३ कोटी १३ लाख ७७ हजार रुग्ण बरे झाले. या संसर्गामुळे आजवर ५८ लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये ७ कोटी ९२ लाख रुग्ण असून तिथे ९ लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेपाठोपाठ भारत, ब्राझिल, फ्रान्स, ब्रिटन, रशिया, तुर्कस्थान, जर्मनी, इटली, स्पेन या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे.