Coronavirus: तिमिरातुनी तेजाकडे... ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरोघरी दिवा लावू या: पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 09:20 AM2020-04-03T09:20:29+5:302020-04-03T09:32:54+5:30
देशभरात कोरोना व्हायरसचं संकट वाढत आहे. आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे
नवी दिल्ली – कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊन होऊन आज ९ दिवस झाले, या काळात सर्वांनी एकत्र येऊन सरकार, प्रशासन यांनी आपापल्यापरिने यशस्वी केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले. जनता कर्फ्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक हे भारताने जगाने शिकवलं. कोरोनाविरुद्ध जनता एकत्र येऊन सामूहिकरित्या ही लढाई लढतोय हे जनतेने दाखवून दिलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ही लढाई एकटा कसा लढू असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. किती काळ ही परिस्थिती राहणार हे सर्वांच्या मनात आहे. पण आपण घरात असलो तरी एकटे नाही, सामूहिक शक्तीने आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत. जनता ईश्वराचा अवतार असतो असं समजलं जातं. देश ही इतकी मोठी लढाई लढताना आपल्या शक्तीचं दर्शन वारंवार घडवून देत आहे. आपला मार्ग अधिक स्पष्ट करतो. कोरोनाच्या अंधकारातून निरंतर प्रकाशाकडे जायचं आहे. कोरोना संकटामुळे गरीब जास्त प्रभावित झाले आहेत. या संकटातून त्यांना नवीन ऊर्जा मिळवून द्यायची आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच या कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
A video messsage to my fellow Indians. https://t.co/rcS97tTFrH
— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2020
त्याचसोबत या आयोजनावेळी कोणालाही एकत्र जमायचं नाही, रस्त्यावर, गल्लीमध्ये परिसरात जमू नये, सोशल डिस्टेंसिगची लक्ष्मण रेषा ओलांडू नका, कोरोनाचं संक्रमण तोडण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. प्रत्येकाने एकजुटीने संकटाशी मुकाबला करण्याची शक्ती मिळू दे अशी प्रार्थना करा. आपला उत्साह, ऊर्जा यापेक्षा जगात काहीच मोठं नाही, आपल्या या ताकदीने कोणतं संकट आपल्याला हरवू शकत नाही. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
देशभरात कोरोना व्हायरसचं संकट वाढत आहे. आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोनाचे संकट युद्धापेक्षा मोठं आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवावा की नाही याबाबत राज्याच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा तसेच लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवा, जेणेकरुन लोकांची गर्दी होणार नाही अशी सूचना मोदींनी दिली होती.