Coronavirus : कोरोना संसर्गाचा सामना करायला येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळू या, पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:41 AM2020-03-20T07:41:32+5:302020-03-20T07:41:58+5:30
गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या
नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊ न करायचा आहे. कोरोनामुळे देशवासीयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पण गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे टाळायला हवे. पुढील काही आठवडे घरातून बाहेर जाऊ नका. गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
हा जनता कर्फ्यूचा (जनतेतर्फे स्वयंस्फूर्त संचारबंदी) प्रयोग किती यशस्वी होतो, यावर पुढील पावले टाकता येतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. म्हणजेच जनता कर्फ्यूला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून सरकार पुढील उपाययोजना करेल, असे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून केलेल्या अतिशय भावनिक भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या महिन्या - दीड महिन्यात १३0 कोटी भारतवासीयांनी ठामपणे कोरोनाचा सामना केला आहे. पण तेवढे पुरेसे नाही. त्यामुळे आपल्याला याहून अधिक सतर्क राहायला हवे. जागतिक महामारीच्या रूपाने पुढे आलेल्या कोरोनाच्या विषाणूंवर अद्याप औैषध सापडलेले नाही. त्यामुळे संकल्प व संयम पाळूनच आपणा सर्वांना मिळून कोरोनाला तोंड द्यायचे आहे.
आपल्याला हा संयम व संकल्प ‘जनता कर्फ्यू’च्या स्वरूपात दाखवून द्यायचा आहे. या काळात कोणीच घराबाहेर पडता कामा नये. पण संध्याकाळी ५ वाजता सर्वांनी घराच्या दरवाजापाशी येऊ न टाळ्या वाजवून कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लढणारे डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करावे, असे मोदी म्हणाले. मात्र या दिवशी अत्यावश्यक सेवांसाठी तसेच आरोग्य तपासणीसाठी बाहेर पडणाऱ्यांना अडवू नका. या लढाईत आपल्याला मदत करण्यासाठीच काही जणांना बाहेर पडावे लागेल, हे लक्षात घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वृत्तपत्रांचे कौतुक
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात वृत्तपत्रांचेही कौतुक केले. ते म्हणाले, या संपूर्ण संकटाच्या काळात वर्तमानपत्रांनी जे काम केले आहे, ते अतुलनीय आहे.
धान्याचा साठा करू नका
अन्नधान्याची वा कोणत्याच वस्तूची साठवणूक करू नका. त्यासाठी गर्दी करू नका. आपल्याकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे त्याची टंचाई भासणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्ध लढताना निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर राहील.
पगार कापणे चुकीचे
जे अत्यावश्यक सेवेत नाहीत, त्यांनी कामावर जाऊ नये. पण त्यांचे पगार कंपन्या, व्यापारी व उद्योजकांनी कापू नयेत, असे आवाहन करून पंतप्रधान मोदी म्हणाले, या काळात गरीब व कामगारांचे हितही पाहायचे आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांची आर्थिक अडचण होणार नाही, हे पाहणे आपली जबाबदारी आहे.