CoronaVirus Live Update: दिलासादायक! कोरोना लाटेत मद्रास आयआयटीने दिली चांगली बातमी, पण १४ दिवस महत्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 04:01 PM2022-01-23T16:01:38+5:302022-01-23T16:02:32+5:30
corona Virus Pick in 14 days: 'आर-व्हॅल्यू' म्हणजे एक व्यक्ती किती लोकांना संक्रमित करू शकते हे सांगते. जर हा दर एकापेक्षा कमी झाला तर असे मानले जाते की जागतिक महामारी संपली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात तीन लाखांवर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. यामुळे अनेक विश्लेशकांच्या मते कोरोना लाटेचा पीक आला आहे. दुसरीकडे भारत सरकारच्या समितीने देशात ओमायक्रॉनचे सामुहिक संक्रमण सुरु झाल्याची घोषणा केली आहे. अशातच मद्रास आयआयटीने दिलासा देणारी बातमी दिली आहे. गेल्या १५ दिवसांत आर व्हॅल्यू निम्म्याने कमी झाली आहे, यामुळे कोरोनाची लाटही ओसरण्याची शक्यता वर्तविली आहे.
सध्या, 14 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान देशातील सरासरी आर मूल्य 1.57 वर आली आहे. याआधी, डिसेंबर 2021 आणि जानेवारी 2022 या दोन आठवड्यात देशात 'आर व्हॅल्यू'मध्ये सातत्याने वाढ झाल्यानंतर, गेल्या आठवड्यात म्हणजेच 7 ते 13 जानेवारी रोजी पहिल्यांदाच घसरणीची नोंद झाली होती. आर मूल्य जितके कमी असेल तितका संसर्ग दर कमी होईल.
'आर-व्हॅल्यू' एक व्यक्ती किती लोकांना संक्रमित करू शकते हे सांगते. जर हा दर एकापेक्षा कमी झाला तर असे मानले जाते की जागतिक महामारी संपली आहे. आयआयटी मद्रासच्या विश्लेषणानुसार, 14 ते 21 जानेवारी दरम्यान आर-व्हॅल्यू 1.57, 7 ते 13 जानेवारी दरम्यान 2.2, 1 ते 6 जानेवारी दरम्यान 4 आणि 25 ते 31 डिसेंबर दरम्यान 2.9 होती.
प्रोफेसर नीलेश एस उपाध्याय आणि प्रोफेसर एस सुंदर यांच्या अध्यक्षतेखाली गणित विभाग आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स अँड डेटा सायन्स, IIT मद्रास यांनी संगणकीय मॉडेलिंगद्वारे प्राथमिक विश्लेषण केले. आकडेवारीनुसार, मुंबईची आर-व्हॅल्यू 0.67, दिल्लीची आर-व्हॅल्यू 0.98, चेन्नईची आर-व्हॅल्यू 1.2 आणि कोलकाताची आर-व्हॅल्यू 0.56 आहे. आयआयटी मद्रासच्या गणित विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. जयंत झा यांनी सांगितले की, मुंबई आणि कोलकाता येथील आर-व्हॅल्यूज असे सूचित करतात की तेथे महामारीचे शिखर संपले आहे, तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये ते अद्याप एकाच्या जवळपास आहे.
१४ दिवसांनी कोरोना उच्चांकावर असेल...
झा म्हणाले की, त्यांच्या विश्लेषणानुसार, कोरोना विषाणूचा उच्चांक येत्या 14 दिवसांत 6 फेब्रुवारीपर्यंत येईल. यापूर्वी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान तिसऱ्या लाटेचा उच्चांक येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.