CoronaVirus Live Updates : चिंतेत भर! ओमायक्रॉनच्या संकटात कोरोनाचा विस्फोट, 'या' ठिकाणी तब्बल 39 विद्यार्थी पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:16 PM2022-01-14T14:16:12+5:302022-01-14T19:29:42+5:30
शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. कोरोनाचा धोका वाढला असून 39 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत.
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. कोरोनाचा धोका वाढला असून 39 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मिळालेलेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये 39 विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील अनेक शाळांमधील 39 मुले पॉझिटिव्ह आल्याचं आढळून आले आहे. जामा ब्लॉकमधील चार हायस्कूलमधील 34 विद्यार्थी आणि जरमुंडी, दुमका आणि शिकारीपाडा ब्लॉकमधील इतर पाच शाळेतील मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. दुमकाचे सिव्हिल सर्जन बच्चा प्रसाद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामा ब्लॉकच्या तीन शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या मुलांचे वय 6 ते 18 वर्षे वयोगटातील आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,64,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 5,753 वर पोहोचला आहे.
चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय ओमायक्रॉन?; ताप आल्यास हलक्यात न घेता वेळीच व्हा सावध
मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ताप येत असेल तर काळजी घ्या. ओमायक्रॉनच्या संकटात मुलांच्या आरोग्याकडे कसं लक्ष द्यायचं याबाबत तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे. यशोदा हॉस्पिटल, गाझियाबादचे एमडी डॉ. पीएन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची तिसरी लाट इतर दोन लाटांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळेच हे लहान मुलांसाठीही धोकादायक आहे. कोरोनाची तिसरी लाट मुलांनाही संक्रमित करू शकते. त्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या मुलांमध्ये खूप ताप आणि थरथरणे यासारखी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कोरोनाबाधित मुलांचे वय 11 ते 17 वर्षे दरम्यान आहे. दोन वर्षांखालील मुलांमध्येही ही लक्षणे दिसून येत आहेत. डॉ. अरोरा यांनी ओमायक्रॉन हा डेल्टा प्रकारापेक्षा थोडा वेगळा आहे. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं सांगितलं.