CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,126 नवे रुग्ण, 332 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 11:35 AM2021-11-09T11:35:52+5:302021-11-09T11:36:50+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 10 हजार 126 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (9 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,126 अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 3,43,77,113 पोहोचली आहे. तर 4,61,389 लोकांचा मृत्यू झाला आहे.
COVID19 | India reports 10,126 new cases (lowest in 266 days) and 332 deaths in the last 24 hours; Active caseload stands at 1,40,638; lowest in 263 days : Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/yAiSwzZ2Tt
— ANI (@ANI) November 9, 2021
कोट्यवधी लोकांनी घेतली कोरोनाची लस
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. दिल्लीमध्ये एका दिवसात कोरोनाच्या 25 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, याच दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट हा 0.06 टक्के आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाला हलक्यात घेणं आता जीवघेणं ठरू शकतं. तब्बल 53 देशांमध्ये नव्या लाटेचा धोका निर्माण झाला असून WHO ने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. लसीकरणानंतरही युरोप कोरोना महामारीचं केंद्र झालं आहे.
कोरोनाला हलक्यात घेणं ठरेल जीवघेणं; 53 देशांमध्ये नव्या लाटेचा धोका, WHO चा गंभीर इशारा
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच काही देशांनी टेन्शन वाढवलं आहे. 53 देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या आणखी एका लाटेचा धोका आहे किंवा यातील बरेच देश आधीच महामारीच्या नवीन लाटेचा सामना करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख डॉ. हॅन्स क्लुज यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची संख्या ही पुन्हा विक्रमी पातळीवर वाढू लागली आहे. या भागात कोरोना प्रसाराचा वेग ही बाब गंभीर चिंतेचा विषय आहे. जर हे असंच सुरू राहीलं तर फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो असं देखील म्हटलं आहे. जगभरात लसीकरण वेगाने सुरू असताना देखील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.