CoronaVirus Live Updates : चिंताजनक! गेल्या 24 तासांत 21,566 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:54 AM2022-07-21T11:54:39+5:302022-07-21T12:01:51+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तसेच मृतांचा आकडा देखील चिंता वाढवणारा आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तरी देखील गेल्या काही दिवसांपासून 20 हजारांहून नवीन रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा भयावह वेग पाहायला मिळत असून गेल्या 24 तासांत 21 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (21 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 21,566 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 5,25,870 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
#UPDATE COVID-19 | India reports 45 new deaths in the last 24 hours. pic.twitter.com/Y9NQ2aiQ08
— ANI (@ANI) July 21, 2022
देशातील कोट्यवधी लोकांनी कोरोनावर मात केली असून अनेकांनी लस देखील घेतली आहे. मात्र आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क लावण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच पॉझिटिव्हिटी रेट वाढून 4.25 टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील 1 लाख 48 हजारांवर पोहोचली आहे. देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असं असताना आता कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये काही रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांना आता सावध राहण्याची गरज आहे.
कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, 4 जण लाईफ सपोर्टवर
मुंबईमध्ये इन्फ्लूएन्झा H1N1 ची लागण झालेले किमान चार रुग्ण लाईफ सपोर्टवर आहेत. शहरात पुन्हा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ज्या लोकांची कोविड -19 चाचणी निगेटिव्ह येत आहे, त्यांनी एच1एन1 चाचणी करावी, असं आवाहन नागरिकांना डॉक्टरांकडून वारंवार केलं जात आहे. जुलैमध्ये इन्फ्लूएंझा H1N1 च्या 11 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर जूनमध्ये दोन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच, ओपीडीमध्ये दररोज स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या किमान दोन ते तीन रुग्णांची नोंद केली जात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.