CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका?; गेल्या 24 तासांत 27,553 नवे रुग्ण, धडकी भरवणारा ग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 10:23 AM2022-01-02T10:23:10+5:302022-01-02T10:51:21+5:30
CoronaVirus Live Updates : ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 28 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 27 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,525 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (2 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,81,770 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
COVID19 | India reports 27,553 fresh infections, 284 deaths and 9,249 discharges in the last 24 hours; Active caseload stands at 1,22,801
— ANI (@ANI) January 2, 2022
Omicron case tally rises to 1,525 pic.twitter.com/KH605GBwDA
लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा देशातील अनेक ऱाज्यांमध्ये संसर्ग झाला आहे. काही राज्यांनी वाढता धोका लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आहे. दिल्लीमध्ये तर गंभीर परिस्थिती असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे, येत्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नवी लाट येऊ शकते अशी माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. ही लाट काही दिवसांसाठी असेल पण ती मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्गित करेल असं म्हटलं आहे.
"येत्या काही दिवसांत रुग्णवाढीचा दर वेगाने वाढणार"
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून येत्या काही दिवसांत रुग्णवाढीचा दर वेगाने वाढणार आहे, असा इशारा केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची अल्प काळातील लाट येऊन अधिकाधिक नागरिकांना ओमायक्रॉनची लागण होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिजनेस स्कूलमधील प्रा. पॉल कट्टूमन यांनी "कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित केला असून एका ई-मेलमध्ये त्यांनी लिहिले आहे, येत्या काही दिवसांत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढेल. कदाचित या आठवडय़ातही वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत किती वाढ होईल, हे आता सांगणे कठीण आहे" असं देखील म्हटलं आहे. कट्टूमन आणि त्यांचा संशोधक गट गेल्या काही दिवसांतील भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहेत.