CoronaVirus Live Updates : तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही झाला कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 10:04 AM2022-02-13T10:04:04+5:302022-02-13T10:10:06+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली - जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 44,877 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (13 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 684 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात 5,08,665 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,37,045 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
India reports 44,877 new COVID19 cases in the last 24 hours; Active case tally stands at 5,37,045, daily positivity rate at 3.17% pic.twitter.com/1jtcSLlNCx
— ANI (@ANI) February 13, 2022
कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावर साईड इफेक्टने किती जणांचा मृत्यू झाला?; सरकारनं सांगितला आकडा
देश कोरोना संकटाचा सामना करत असून कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान लसीच्या साईड इफेक्टची देखील चर्चा रंगली होती. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्समुळे झालेल्या मृतांचा आकडा आता समोर आला आहे. अँटी-कोविड-19 लसीचा (corona vaccines) दुसरा डोस घेतल्यानंतर विपरित परिणामांच्या घटनांमध्ये 167 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. अशी सर्वाधिक 43 प्रकरणे केरळमध्ये झाल्याची माहिती भारती पवार यांनी सभागृहात दिली.
देशाचा रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर
महाराष्ट्रात 15, पश्चिम बंगालमध्ये 14 आणि मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 12 मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसर्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, गेल्या 3 फेब्रुवारीपर्यंत स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांची 13 प्रकरणे नोंदवली गेली आणि ती सौम्य लक्षणे होती. कोरोनाच्या संकटात पाच राज्यांनी चिंता वाढवली असून तेथील परिस्थिती ही गंभीर आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थानचा समावेश आहे. नव्या रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण याच पाच राज्यांतील आहेत.