Coronavirus Live Updates: पुढील १०० दिवसांपर्यंत कोरोनाची दुसरी लाट; २५ लाखांहून अधिक लोकांना बाधा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 07:14 AM2021-03-26T07:14:10+5:302021-03-26T07:14:24+5:30
एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने अध्ययनानुसार, कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त आहे
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : भारतातील कोविड-१९ साथीची दुसऱ्या लाटेचा प्रभाव मेअखरपर्यंत राहू शकतो; परंतु, एप्रिलच्या मध्यापर्यंत या लाटेचा जोर वाढू शकतो. पंधरा फेब्रुवारी सुरु झालेली कोविड-१९ साथीच्या दुसरी लाट शंभर दिवसापर्यंत राहू शकते, असे स्पष्ट करतांना भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने दुसऱ्या लाटेदरम्यान २५ लाखांहून अधिक लोकांना कोविडची बाधा होऊ शकते, असेही संकेत आहेत.
एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने अध्ययनानुसार, कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त आहे. तथापि, लस उपलब्ध असल्याने लक्षणीय फरक होईल. एसबीआय नियमितपणे कोविड संशोधन अध्ययन करीत आहे. राजस्थान, गुजरात, केरळ, उत्तरांड, हरयाणा यासारख्या राज्यातील ज्येष्ठांच्या लोकसंख्येच्या २० टक्के ६० वर्षे वयाच्या लोकांचे लसीकरण झाले आहे. तथापि, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.
अन्य एका अहवालानुसार, भारतात ज्या वेगाने कोरोना संसर्गाचा फैलाव होत आहे, त्यापेक्षा भारतातील लसीकरणाचा दर अधिक आहे. दोन महिन्यांत भारतातील एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत ५ कोटी ३० लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आला आहे. मागच्या एक वर्षात १ कोटी १७ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली. दिलासादायक म्हणजे कोविडच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग पसरण्याचा दर (आर-फॅक्टर) १.३२ आहे. २०२० मध्ये २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान हा दर १.८३ टक्के होता. नंतर हा दर एप्रिलच्या दुसऱ्या आणि मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याते १.२३ वर उतरला होता.
गेल्या २४ तासांत देशात आढळलेले ५३,४७६ बाधित
कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक, रिकव्हरी रेटमध्येही घट
देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, गुरुवारी गेल्या २४ तासांत तब्बल ५३ हजार ४७६ बाधितांची नोंद झाली. २३ ऑक्टोबरपासून प्रथमच एका दिवसात ५० हजारांहून अधिक बाधित आढळून आले आहेत. गेल्या दहा दिवसांत बाधितांची
संख्या दुप्पट झाली आहे. रिकव्हरी रेट ९५.२८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
लॉकडाऊन प्रभावी ठरला का?
लॉकडाऊन निष्प्रभावी ठरेल. महाराष्ट्र आणि पंजाबसह इतर राज्य याची उदाहरणे आहेत. तेव्हा कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे, हाच एकमात्र प्रभावी उपाय असल्याचे अहवालात नमूद आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील संसर्ग फैलावण्याचे प्रमाण जवळपास स्थिर आहे.