Covaxin घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; लसीच्या आपात्कालिन वापरासाठी WHO ची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:48 PM2021-11-03T17:48:13+5:302021-11-03T17:48:32+5:30
Approval For Covaxin WHO EUL : जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल अॅडव्हायझरी टीमनं कोव्हॅक्सिनच्या इमरजन्सी यूझ लिस्टिंगला दिली मंजुरी.
भारत बायोटेकची (Bharat Biotech) स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लस कोव्हॅक्सिन (Covaxin) घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समूहानं भारताची कोरोना प्रतिबंधात्मक लस कोव्हॅक्सिनला इमरजन्सी यूझ लिस्टिंगसाठी (Emergency Use Listing, EUL) मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकनं इमरजन्सी यूझ लिस्टिंगसाठी १९ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता. यापूर्वी कमिटीने दोनदा कोव्हॅक्सिन उत्पादित करणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
मागील आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने भारतातील स्वदेशी लस कोव्हॅक्सिन (Covaxin)ला आपत्कालीन वापरासाठी यादीत टाकण्यासाठी अतिरिक्त माहिती मागवली होती. या माहितीच्या आधारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.आधीच्या बैठकीबाबत, WHO ने म्हटलं होतं की, लसीचा जागतिक वापर लक्षात घेता अंतिम लाभ-जोखीम मूल्यांकनासाठी निर्मात्याकडून अतिरिक्त स्पष्टीकरण मागवलं जाणं आवश्यक आहं असं 'तांत्रिक सल्लागार गटाने बैठकीत निर्णय घेतला. ग्लोबल हेल्थ एजन्सीनं आधीच स्पष्ट केलं आहे की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी तिचे पूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
Bharat Biotech's Covaxin gets WHO approval for Emergency Use Listing (EUL) pic.twitter.com/zLxcCGYBI2
— ANI (@ANI) November 3, 2021
वापराचा कालावधी वाढवला
सीडीएससीओनं उत्पादनाच्या तारखेपासून १२ महिन्यांपर्यंत कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती भारत बायोटेकनं यापूर्वी ट्विटरद्वारे दिली होती. वापरासाठी मिळालेली ही मंजुरी स्थायी आकड्यांच्या उपलब्धतेवर आधारित आहे, जो सीडीएससीओकडे सादर करण्यात आला होता असंही भारत बायोटेककडून सांगण्यात आलं.
भारत बायोटेकच्या लसीला अनेक देशांची मान्यता
WHO ने आतापर्यंत ६ लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये फायझर, बायोएनटेक (Pfizer/BioNtech) कोमिरनेटी, एस्ट्राजेनेका कोविशील्ड (AstraZeneca's Covishield) जॉन्सन अँन्ड जॉन्सन (Johnson & Johnson's Vaccine), मॉडर्ना (Moderna) सिनोफार्म( Sinopharm)या लसींचा समावेश आहे. तथापि, असे अनेक देश आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी आणि प्रवाशांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. या देशांमध्ये गयाना, इराण, मॉरिशस, मेक्सिको, नेपाळ, पॅराग्वे, फिलीपिन्स, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, ओमान, श्रीलंका, एस्टोनिया आणि ग्रीस यांचा समावेश आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्या दोन लसी आहेत. ऑस्ट्रेलियाने आधीच कोविशील्डला मान्यता दिली आहे.